अमरावती : अन्न व औषधी प्रशासन आणि पोलीस विभागाने संयुक्तरीत्या धाड टाकून दोन व्यापारी प्रतिष्ठानांच्या गोदामातून तब्बल ११ लाख २० हजार ९२५ रुपयांचा गुटखा मंगळवारी दुपारी जप्त केला. चार दिवसांपूर्वीच न्यू ईगल सेल्स या प्रतिष्ठानातून गुटखा जप्त करण्यात आला. राजकुमार मोटवानी हे न्यु ईगलचे संचालक असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पुन्हा त्याच प्रतिष्ठानाच्या गोदामातून हा गुटखा जप्त करण्यात आला. सोबतच मंगळवारी मां शारदा रिचार्ज या प्रतिष्ठानात खाद्यपदार्थांची विक्री केली जात असल्याचे निदर्शनास आले असून या दोन्ही प्रतिष्ठानांचे परवाने रद्द करावे, असे पत्र पोलीस विभागाने एफडीएला दिले आहे. पोलीस उपायुक्त शशिकांत सातव व एफडीएचे अन्न सुरक्षा अधिकारी वाकडे यांनी मंगळवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास न्यु ईगल सेल्स व मां शारदा रिचार्ज या दोन प्रतिष्ठानांत धाड टाकली. त्यावेळी गुटखा विक्री सुरू असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी प्रतिष्ठानाची झडती घेतली असता प्रतिष्ठानासह गोदामात मोठ्या प्रमाणात गुटखा आढळून आला. एफडीए अधिकाºयांनी तो माल जप्त केला. मां शारदा रिचार्जमध्ये मोबाईल सिम रिचार्जसोबतच खाद्यपदार्थांचीही विक्री केली जात होती. ही बाब नियमबाह्य असल्यामुळे त्यांच्यावरही कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. सलग दोनवेळा तेथे गुटखाजन्य पदार्थ आढळल्याने या प्रतिष्ठानाचे परवाने रद्द करावे, असे पत्र पोलिसांनी एफडीएला दिले आहे.
तनवीर आलमचा हस्तक्षेप कसा ?गुटखा मालाचा पदार्फाश झाल्यानंतर तेथे सामाजिक कार्यकर्ते तनवीर आलम पोहोचले. त्यांनीही गुटखा माल लपविलेल्या जागा पोलिसांना दाखविल्या. त्यामुळे प्रतिष्ठान संचालकाने आक्षेप घेत तनविर आलम यांचा गुटखा विक्रीसंदर्भात हस्तक्षेप कसा, असा प्रश्न निर्माण केला.