परतवाडा : अचलपूर नगरपालिका क्षेत्रात कोरोनाची नियमावली न पाळणाऱ्या नागरिकांसह व्यावसायिकांकडून प्रशासकीय यंत्रणेने ११ लाख ३८ हजार ३०० रुपयांचा दंड वसूल केला. एप्रिल २०२० ते मे २०२१ दरम्यान चौदा महिन्यांतील ही दंडात्मक वसुली आहे.
या १४ महिन्यांत सार्वजनिक ठिकाणांवर थुंकल्याप्रकरणी चौघांकडून १३०० रुपये, मास्क न वापरणाऱ्या २,४१९ लोकांकडून ५ लाख ५४ हजार १६० रुपये, तर नियमावलीचे पालन न करणाऱ्या दुकानदारांकडून ४ लाख ५४ हजार ३९० रुपये दंड स्वरूपात नगरपालिकेच्या प्रशासकीय यंत्रणेने वसूल केले आहेत.
अचलपूर नगरपालिका क्षेत्रात कोरोना महामारीने उग्र रूप धारण केले आहे. दररोज कोरोनाचे रुग्ण वाढतच आहेत. यातच कोरोना बाधितांच्या मृत्यूचा आकडाही लक्षवेधक आहे. असे असूनही शहरात सोशल डिस्टंसिंग न पाळणाऱ्या आणि कोरोनाच्या नियमावलीकडे दुर्लक्ष करणाऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे. भाजीबाजारासह मार्केटमध्ये नागरिकांची गर्दी वाढतच आहे. कोरोनाची भीती नसल्यागत ते नागरिक वागत आहेत. दुकानदारही याकडे दुर्लक्ष करीत आपल्या व्यवसायाकडे तेवढे लक्ष देऊन आहेत.
बॉक्स १
महसूल, पोलीस दिमतीला
या सर्वांवर नियंत्रण मिळविण्याकरिता अचलपूर नगरपालिका प्रशासनाने वेगवेगळी पथके गठित केली आहेत. राजस्व विभाग आणि पोलीस विभाग त्यांच्या मदतीला उभा आहे. नागरिकांनी कोरोना नियमावलीचे पालन करून स्वतःला सुरक्षित ठेवावे, याकरिता ही पथके आजही कार्यरत आहेत.
बॉक्स
यंत्रणेलाही कोरोनाची बाधा
रस्त्यावर उतरून कोरोनाच्या अनुषंगाने नागरिकांना सतर्क करणारी अचलपूर नगरपालिकेसह राजस्व विभागच्या प्रशासकीय यंत्रणेलाच आज कोरोनाने ग्रासले आहे. अनेक अधिकारी, कर्मचारी यात कोरोनाग्रस्त आहेत. दरम्यान या यंत्रणेच्या मदतीला शिक्षकही रस्त्यावर राबत आहेत.