अमरावती : राज्य परिवहन महामंडळाच्या विभागात तिकीट साठ्यात तफावत आढळून आल्याने या प्रकरणात प्राथमिक चौकशी अहवालात दोषी आढळल्याने ११ अधिकारी व कर्मचाऱ्यांना महामंडळाचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी निलंबित केले आहे. एसटी महामंडळातील या कारवाईमुळे एकच खळबळ उडाली आहे.
एसटी महामंडळाच्या अमरावती आगारात सन २०१९ ते २०२२ या कालावधीत प्रवाशाच्या तिकीट साठ्यामध्ये तफावत असल्याचा प्रकार समोर आला होता. या प्रकरणी विभाग नियंत्रकांनी चौकशीचे आदेश दिले होते. यानुसार विभागीय वाहतूक व लेखाअधिकारी यांच्या पथकाने या प्रकरणाची प्राथमिक चौकशी करून याबाबतचा अहवाल आगार व्यवस्थापकांना सादर केला होता.
हा प्राथमिक अहवाल वरिष्ठ अधिकारी यांच्याकडे प्राप्त होताच यामध्ये तिकीट साठ्यात तफावत असल्याचा निष्कर्ष अहवाल काढण्यात आला. त्यानुसार तिकीट साठा अद्ययावत न ठेवता या कामात हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवत सहायक वाहतूक अधिकारी, तत्कालीन आगार लेखापाल यांच्यासह सहा लिपिक, ३ वाहतूक नियंत्रक अशा अमरावती आगारातील ११ अधिकारी व कर्मचाऱ्यांवर निलंबन कारवाई करण्यात आलेली आहे. एसटी महामंडळाचे उपमहाव्यवस्थापक, विभाग नियंत्रक आदी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी निलंबन कारवाई केलेली आहे. एकाच आगारातील एसटी महामंडळात ११ अधिकारी व कर्मचाऱ्यांना निलंबित केल्याने एसटी महामंडळात खळबळ उडाली आहे.
अमरावती आगारातील तिकीट साठ्यात तफावत आढळून आली होती. या प्रकरणाच्या प्राथमिक चौकशीचा अहवाल प्राप्त झालेला आहे. यात संबंधित अधिकारी यांनी साठा अद्ययावत ठेवण्यात दुर्लक्ष केले आहे, तर या प्रकारात अन्य कर्मचारी दाेषी आढळले. त्यामुळे त्याच्या प्राथमिक अहवालानुसार निलंबन कारवाई केली आहे. अंतिम चौकशीनंतर पुढील कारवाई केली जाईल.
- नीलेश बेलसरे, विभाग नियंत्रक अमरावती.