परतवाडा : कोरोनाच्या अनुषंगाने रॅपिड अॅन्टिजेन टेस्ट करण्याची परवानगी मिळविलेल्या खासगी पॅथॉलॉजी लॅबपैकी ११ लॅबची परवानगी २० फेब्रुवारीपासून रद्द करण्यात आली. जिल्हाधिकाऱ्यांच्या १७ फेब्रुवारीच्या सूचनेनुसार जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम यांनी १८ फेब्रुवारीच्या पत्रान्वये परवानगी रद्द करण्याचे आदेश निर्गमित केले आहेत.
ज्या रुग्णांची रॅपिड अॅन्टिजेन टेस्ट निगेटिव्ह आहे, परंतु त्याला लक्षणे उद्भवली आहेत, अशा रुग्णांचा आरटी-पीसीआर सॅम्पल मोफत घेऊन आयसीएमआर फॉर्ममध्ये सर्व आवश्यक माहिती भरून, शासकीय प्रयोगशाळा (अमरावती) आणि जिल्हा सामान्य रुग्णालयाकडे पाठविण्याच्या अटीवर या पॅथॉलॉजी लॅबला परवानगी देण्यात आली होती. यादरम्यान कोरोना रुग्णांची संख्या वाढली. अचलपूर, अमरावती ‘हॉट स्पॉट’ बनले. यातच राज्य शासनाचे सल्लागार डॉ. सुभाष साळुंके यांचा पाहणी दौरा १६ फेब्रुवारीला झाला. याच दिवशी डॉ. साळुंके यांनी आपल्या अभिप्रायासह जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्तांना माहिती दिली. अचलपूर सर्कीट हाऊसमधील आढावा बैठकीत डॉ. साळुंके यांच्यापुढे खासगी लॅबचा पाढा प्रशासनाकडून वाचण्यात आला.
यानंतर लगेचच परतवाडा येथील डॉ. खुशबू बरडिया, डॉ. विशाखा चंदनानी आणि डॉ. ओ.आर. बोहरा यांच्यासह अमरावती येथील डॉ. उल्हास संगई, डॉ. सतीश भागवत, डॉ. आशिष तायडे, डॉ. सुवर्णा कुऱ्हाडे, डॉ. तृप्ती वानखडे, डॉ. प्रकाश कोठारी, डॉ. श्याम नेमाडे तसेच चांदूर रेल्वे येथील डॉ. संजय महंतपुरे यांच्याकडील खासगी पॅथॉलॉजी लॅबला दिली गेलेली कोविड-१९ ची रॅपिड अॅन्टिजेन टेस्ट करण्याची परवानगी जिल्हा शल्यचिकित्सकांनी रद्द केली आहे.
मान्यता वादाच्या भोवऱ्यात
परतवाडा शहरातील पाच खासगी पॅथॉलॉजी लॅबकडे ही रॅपीड अॅन्टिजेन टेस्टची परवानगी देण्यात आली होती. यातील तीन लॅबची परवानगी काढून घेण्यात आली असली तरी डॉ. समिता चित्रकार व डॉ. आर.टी. भन्साली यांच्याकडील परवानगी कायम ठेवण्यात आली आहे. याबाबत स्थानिक प्रशासनाकडून आश्चर्य व्यक्त होत आहे.