परतवाडा : वाईल्ड लाईफ क्राईम सेल मेळघाट टायगर रिझर्व्ह अमरावती आणि वाईल्ड क्राईम सेल ब्युरो मुंबई यांच्या संयुक्त कारवाईत कराड येथे ११ वाघनखांसह दोन आरोपींना पकडण्यात वन्यजीव विभागाला यश आले आहे.
दिनेश रावल (३८, रा. सोमवार पेठ, कराड) आणि अनूप रेवणकर (३६, रा. रविवार पेठ, कराड) यांना गोपनीय माहितीवरून १६ ऑगस्टला सातारा जिल्ह्यातील कराड येथून अटक करण्यात आली. कराड न्यायालयाने या दोन्ही आरोपींना २० ऑगस्टपर्यंत चार दिवसांची वनकोठडीत पाठविले आहे. ही कारवाई मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या मुख्य वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक जयोती बॅनर्जी आणि वाइल्ड क्राईम सेल ब्युरो मुंबईचे क्षेत्रीय उपनिरीक्षक योगेश वरखड व उपवनसंरक्षक महादेव मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. सहायक वनसंरक्षक महेश झांजुरणे प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.
वन व वन्यजीव अधिकाऱ्यांनी रावल याच्याकडून लेडीज शॉपीमधून दोन वाघनखे, तर रेवणकर याच्या सुवर्णालंकाराच्या दुकानातून आठ वाघनखे व आरोपीच्या गळ्यातील एक वाघनख अशी एकूण ११ वाघनखे जप्त केली आहेत. घटनेच्या अनुषंगाने वाघनखाचे किंवा दातांचे लॉकेट करून गळ्यात घालणे हासुद्धा अजामीनपात्र गुन्हा असल्याचे वनअधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. जप्त वाघनखांपैकी काही वाघनखे बिबट वाघाचे असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. यात आंतरराज्य टोळी सहभागी असल्याचा संशय अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. या वाघनखांचे बाजार भाव अमूल्य असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. यापूर्वी राज्यासह राज्याबाहेरील वन्यजीव गुन्हे उघडकीस आणून आरोपींना पकडून देण्यात वाईल्ड लाईफ क्राईम सेलची भूमिका उल्लेखनीय राहिली आहे.