पारितोषिकांचा वर्षाव
लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या ३७ व्या दीक्षांत समारंभ शनिवारी आभासी पद्धतीने थाटात पार पडला. ३१६ संशोधकांना आचार्य (पीएच.डी.) पदवी तसेच विद्याशाखानिहाय गुणवत्ता यादीनुसार ११० सुवर्ण, २२ रौप्यपदके, रोख २२ पारितोषिके तसेच ५५ हजार ३५९ पदवी व २४० पदविका या समारंभात विद्यार्थ्यांना जाहीर करण्यात आल्या. विशेषत: या समारंभात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावतीने कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांच्या हस्ते अनाथांचे नाथ शंकरबाबा पापळकर यांना डी.लिट. ही मानद उपाधी प्रदान करण्यात आली.दीक्षांत समारंभाच्या अध्यक्षस्थानी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी होते. केंद्रीय रस्ते वाहतूक व परिवहन मंत्री नितीन गडकरी हे मुख्य अतिथी आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत हे होते. कुलगुरू मुरलीधर चांदेकर, प्र-कुलगुरू राजेश जयपूरकर, अधिष्ठाता एफ.सी. रघुवंशी, अविनाश माेहरील, वैशाली गुडधे, व्ही.डब्ल्यू. निचित, कुलसचिव तुषार देशमुख, परीक्षा व मूल्यांकन मंडळाचे संचालक हेमंत देशमुख, व्यवस्थापन परिषदेच्या सदस्य मीनल ठाकरे आदी उपस्थित होते. प्रास्ताविक कुलगुरूंनी केले. हा समारंभ कोविड-१९ च्या नियमांचे पालन करून घेण्यात आला. राज्यपाल तसेच कुलगुरूंनी विद्यार्थ्यांना पदके, पारितोषिके जाहीर केले. या दीक्षांत समारंभात मुलांमध्ये सर्वाधिक सुवर्णपदके अकोला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा तेजस राठी याने पटकावली. पाच सुवर्ण व एक रौप्यपदक त्याच्या खात्यात गेली. मुलींमध्ये अमरावती विद्यापीठाच्या पदव्युत्तर मराठी विभागाची सारिका वणवे हिने सहा सुवर्ण, एक रोख पारितोषिक पटकाविले. ८३ विद्यार्थ्यांना पदकांनी गौरविण्यात येणार असून, यात ६५ मुली व १८ मुलांचा समावेश आहे. पदके पटकाविण्यात मुलीच आघाडीवर असल्याचे वास्तव आहे.दानदाते स्व. डी.एन. उपाख्य बबनराव मेटकर यांच्याकडून कै. नागोरावजी जयरामजी मेटकर स्मृतीप्रीत्यर्थ संत गाडगेबाबा सामाजिक कार्य पुरस्कारासाठी एक लक्ष रुपये अतिरिक्त दाननिधी प्राप्त झाल्याबद्दलची माहिती कुलसचिव तुषार देशमुख यांनी दिली. कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीत व विद्यापीठ गीताने झाली. संचालन मराठी विभागप्रमुख मोना चिमोटे व प्रणव कोलते यांनी केले. कार्यक्रमाची सांगता पसायदान व राष्ट्रगीताने झाली. महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयाच्या चमूने गीताचे सादरीकरण केले.
शंकरबाबांच्या कार्याला मनस्वी दादसमाजसेवक शंकरबाबा पापळकर यांना मानद मानवविज्ञान पंडित (डी.लिट.) ही विद्यापीठाची सर्वोच्च पदवी देऊन कुलपतींच्यावतीने कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांनी सन्मानित केले. त्यांना गौरवपत्र, शाल व गाडगेबाबांची प्रतिमा देऊन सन्मान करण्यात आला. मात्र, समारंभाच्या प्रारंभी विद्यापीठाने चित्रफितीच्या माध्यमातून शंकरबाबांचा जीवनपट उलगडला. शंकरबाबांचे बालपण, शिक्षण आणि अनाथांचा बाप म्हणून १२३ मुला-मुलींचा सांभाळ करताना येणाऱ्या वास्तवाचे दर्शन झाले. डी.लिट. पदवी प्राप्त करण्यासाठी शंकरबाबा हे अनाथ मुलांसह विद्यापीठात उपस्थित झाले होते. अमरावती विद्यापीठाने शंकरबाबांना डी.लिट. पदवीने सन्मानित केल्याबद्दल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, ना. नितीन गडकरी, ना. उदय सामंत यांनी मनोगतातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला.