सतीश बहुरूपी
फोटो - व्हॉट्सॲप जालीम पाटील
राजुरा बाजार : विहिरीत घर, मंदिर आणि बारा दरवाजे? अविश्वसनीय अशी ही रचना वरूड तालुक्यातील राजुरा बाजापासून अवघ्या चार किलोमीटर अंतरावर असलेल्या पवनी (संक्राजी) या गावातील शेतात अस्तित्वात आहे. या विहिरीत घरासोबतच एक सुबक असे मंदिरदेखील आहे.
अमरावती जिल्ह्याच्या टोकावरील पवनी (संक्राजी) हे गाव तसे लहान. पण, नऊ सदस्यसंख्या असलेल्या ग्रामपंचायतीच्या या गावातील एका शेतात सुमारे दीडशे वर्षांपूर्वी विटांचा वापर करून ही विहीर अष्टकोणी आकारात बांधण्यात आली. विहिरीत बारा दरवाजे आहेत, या विहिरीला ‘बाराद्वारी’ म्हणूनही ज्येष्ठ नागरिकांमध्ये संबोधले जाते. याठिकाणी तत्कालीन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी गत महिन्यात भेट देऊन विहिरीची पाहणी केली होती.
दिवंगत गोपाळराव सातपुते यांची मालकीचे शेत व ही विहीर आता त्यांचे वंशज शेतकरी यांच्या ताब्यात आहे. ती फारशी खोलही नाही. पाणी मात्र भरपूर आहे. विहिरीत उतरण्यासाठी एक छोटेखानी भुयारी मार्ग आहे. मोबाईलचा टॉर्च सुरू करीत भुयारातून चालताना ऐतिहासिक किल्ल्याचा अनुभव येतो. विशेष म्हणजे खालचे दरवाजे बंद आहेत. या बंद दरवाजामागे दडले काय, याचा शोध अद्याप कुणी घेतलेला नाही. विहिरीत असलेल्या मंदिरात प्राचीन मूर्तींच्या खाणाखुणा आढळतात, पण आता त्या कालौघात नष्ट होत आहेत. विहिरीचे संपूर्ण बांधकाम विटांमधे अत्यंत सुबक व मजबूत आहे. विहिरीच्या वरच्या काठावर सुंदर कोरीव शिल्पकाम केले आहे. त्यामधे राम, सीता, लक्ष्मण, दत्तात्रय तसेच इतर चित्रे आहेत.
बघायला गेलो तर साधी विहीर, पण कोरीव बांधकाम, सुंदर शिल्पकला, भुयारी मार्ग, आत-बाहेरील भव्यदिव्यता आणि सोबतीला घुमणारा आवाज या वैशिष्ट्यांमुळे ही बाराद्वारी विहीर डोळ्यांचे पारणे फेडणारा ऐतिहासिक ठेवाच आहे. लॉकडाऊनमध्ये बंदिस्त असलेल्या पर्यटकांसाठी हे पर्यटनाचे नवे केंद्र ठरू शकते, हे नक्की.
---------
कसे जाल?
अमरावती येथून वरूडला गेल्यानंतर हिरव्या मिरचीच्या बाजारपेठेकरिता प्रसिद्ध राजुरा बाजार या गावातून पवनी (संक्राजी ) हे चार किमी अंतरावर आहे.
-------------------
बाराद्वारी विहीर ही ऐतिहासिक वास्तू आमच्या गावासाठी अभिमानास्पद वास्तू आहे. तिचे जतन करण्यासाठी पुरातत्त्व संशोधन व पर्यटन विभागाने या वास्तूकडे लक्ष द्यावे.
- किशोर बंडू गोळे, सरपंच, पवनी (संक्राजी)