लोकमत इम्पॅक्ट
परतवाडा : निर्धारित जागा सोडून पूर्णा नदीच्या पात्रात अवैध रेती चोरी करणाऱ्या पाच ट्रकवर अचलपूर तहसीलदार व उपविभागीय अधिकाऱ्यांनी १२ लक्ष ५४ हजार रुपये दंड आकारला असून याविरुद्ध ट्रकचालकांनी अपर जिल्हाधिकारी यांच्याकडे अपील दाखल केले आहे.
भातकुली तालुक्यातील पोहरा पूर्णा येथील रेती घाटाचा लिलाव करण्यात आला. मात्र प्रत्यक्षात अचलपूर तालुक्यात अंतर्गत येलकी पूर्णा परिसरातील पूर्णा नदीपात्रात वाळू माफियांनी मोठ्या प्रमाणात रेतीची चोरी केल्याचा प्रकार उघड झाला होता. याची तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे करताच अचलपूर महसूल विभागाने त्यावर पाळत ठेवून पाच ट्रक जप्त केले होते. त्यावर अचलपूर तहसीलदार मदन जाधव यांनी अवैधरित्या गौणखनिज रेती चोरीप्रकरणी प्रत्येकी ५० हजार ८०० रुपये असा २ लक्ष ४ हजार रुपये दंड ठोठावला. उपविभागीय अधिकारी संदीपकुमार अपार यांनी वाहनांचा हा प्रकार पाहता २ लक्ष रुपये प्रत्येकी दंड असा एकूण पाच ट्रक विरुद्ध १० लक्ष रुपये असा एकूण १२ लक्ष ५४ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. यासंदर्भात ‘लोकमत’ने वाळू माफिया लाखो रुपयांचा महसूल घशात घालीत असल्याचे वृत्त प्रकाशित केला होते. तर सदर ट्रक विरुद्ध प्रशासनाच्या वतीने कारवाई केल्याचे ‘लोकमत’ ला सांगण्यात आले. मात्र प्रत्यक्षात रक्कम सांगण्यात आली नव्हती. हे विशेष.
बॉक्स
पुढील कारवाई अपर जिल्हाधिकाऱ्यांकडे
रेती चोरट्यांच्या पाच ट्रकविरुद्ध कारवाई होताच तस्करांमध्ये खळबळ उडाली होती. तहसीलदार व उपविभागीय अधिकारी यांनी आकारलेल्या नोटिसा बजावल्या असून याविरोधात ट्रक चालकांनी अपर जिल्हाधिकाऱ्यांकडे दाद मागितली आहे. त्यामुळे या ट्रकवर आकारलेला दंड वसूल होणार की सुटणार हे निर्णय अंतिम औत्सुक्याचे ठरणार आहे.
बॉक्स
अवैध उत्खनावर चाप कुणाचा?
पूर्णा नदीपात्रातून वाटेल तेथे खड्डे करून वाळूमाफिया मोठ्या प्रमाणात रेतीची चोरटी वाहतूक करीत असल्याचे चित्र आहे. त्यावर विविध समित्या देखरेखीसाठी असल्या तरी प्रत्यक्षात होणारी कारवाई मात्र नगण्य आहे. शासनाचा महसूल सोबत असताना दुसरीकडे यातून पर्यावरणाचा धोकाही निर्माण झाला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी पूर्णा नदी पात्रातील वाळू माफियांच्या मुसक्या आवळणे गरजेचे झाले आहे.