लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : गुरुवारी आणि शुक्रवारी राष्ट्रीयीकृत बँक कर्मचाऱ्यांनी खासगीकरणाच्या मुद्यावरून संप पुकारला आहे. देशातील सार्वजनिक क्षेत्रातील बँकांतील सर्व कर्मचारी, अधिकारी दोन दिवसीय संपावर आहेत. परिणामी अमरावती जिल्ह्यात गुरुवार आणि शुक्रवार या दोन दिवसात अंदाजे २४०० कोटी रुपयांचे व्यवहार ठप्प झाल्याची माहिती आहे. या संपात अमरावती विभागातील ७०० अधिकारी व ९०० कर्मचारी सहभागी झाले आहेत.केंद्र सरकारकडून बँकिंग ॲक्ट १९७०-१९८० या कायद्यात दुरुस्ती करून राष्ट्रीयीकृत बँकांचे खासगीकरण करण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू आहेत. असे करताना बँक ग्राहक, ठेवीदार, भागधारक ,अर्थतज्ज्ञ, राजकीय पक्ष -संघटना या कुणालाही विश्वासात न घेता, त्यांचा विरोध डावलून सरकार हा देशहितविरोधी निर्णय घेत असल्याचा आरोप युनायटेड फोरम ऑफ बॅक युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. अमरावतीत एसबीआय बँकेसमोर गुरूवारी संपकऱ्यांनी निदर्शने करीत या धोरणाचा तीव्र विरोध केला. एसबीआय ऑफिसर असोसिएशन फोरमचे विभागीय अध्यक्ष मंगेश मिसाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार, इंटरनेट बँकिंग, कॅश डिपॉझिट मशीन, एटीएम आदी सुरू आहेत. तथापि, जिल्ह्यातील सर्व अधिकारी व कर्मचारी या संपात सहभागी झाले आहेत.
जिल्ह्यात दीडशे राष्ट्रीयीकृत बँकांचा सहभागकेंद्र शासनाच्या धोरणाविरोधात राष्ट्रीयीकृत बँकांनी पुकारलेल्या दोन दिवसीय संपात जिल्ह्यातील सुमारे दीडशे बँकेचे अधिकारी, कर्मचारी, शिपाई सहभागी झाले आहेत. ऑफलाईन कामकाज गुरुवारी पूर्णत: बंद होते. बँकेच्या परिसरात शुकशुकाट होता. मात्र ऑनलाईन कामकाज सुरू होते. येथील एसबीआयच्या कर्मचाऱ्यांनी बँकेसमोर निदर्शने करुन शासनाच्या धोरणांचा निषेध केला. अमरावती महानगरासह बडनेरा, तिवसा, मोर्शी, वरूड, अचलपूर, चिखलदरा, धारणी, धामणगाव रेल्वे, चांदूरबाजार, भातकुली, नांदगाव खंडेश्वर, अचलपूर या तालुक्यांच्या ठिकाणी राष्ट्रीयीकृत बँकांचे ऑफलाईन कामकाज पूर्णत: ठप्प झाले होते.