धारणी : शहरातील माजी नगरसेवक आसिफ सौदागर यांच्या घरी रविवारी मध्यरात्री चोरीची घटना घडली होती. ती चोरी २० ते २५ लाख रुपयांच्या घरात असल्याचा दावा केला जात होता. प्रत्यक्षात प्राथमिक चौकशीअंती घरातून १२ लाख ३३ हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेल्याची तक्रार सोमवारी उशिरा रात्री नोंदविण्यात आली. त्या तक्रारीवरून अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
तक्रारीनुसार, ९ लाख ३० हजार ४७६ रुपये किमतीचे सोन्याचे दागिने, ७६ हजार २०० रुपयांचे चांदीचे दागिने व २ लाख २५ हजार रुपये रोख असा एकूण १२ लाख ३३ हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेला. घटनास्थळी ठसेतज्ज्ञांना पाचारण करण्यात आले होते. तपासाकरिता शहरातील मुख्य महामार्गावरील दुकानातील सीसीटीव्ही फुटेज पाहण्यात आले. त्यामध्ये संशयास्पद आढळणाऱ्या व्यक्तींची चौकशी केली जात आहे. धारणी पोलिसांसोबतच स्थानिक गुन्हे शाखेचे पथक चोरीचा तपास करीत आहेत.
चोराचा मोबाईल घटनास्थळी
चोरांनी सौदागर यांच्या घरातून सोने, चांदी व रोख रक्कम लंपास केली. परंतु, त्यांचा मोबाईल तेथेच दिवानवर राहिला. तो पोलिसांनी जप्त केला असून, त्या मोबाईलमधून चोरीचा सुगावा मिळण्याचे संकेत आहेत. मोबाईलचा सीडीआर काढून चौकशीला वेग दिला जाईल, असे ठाणेदार निकेतन कदम यांनी सांगितले.
---------------