लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : कोरोना विषाणू संक्रमणाच्या आठवणींसह हे वर्ष मावळत आहे. नवीन वर्षारंभ होण्यासाठी आता २० ते २५ दिवस उरले आहेत. त्या अनुषंगाने राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने २०२१ वर्षातील १९ सार्वजनिक सुट्या जाहीर केल्या आहेत. नव्या वर्षभरातील ५२ रविवार व तेवढेच शनिवार यासह जिल्हाधिकाऱ्यांमार्फत जाहीर पाच सुट्या, दिवाळीच्या सुट्या अशा एकूण १२५ दिवस सुट्यांची पर्वणी शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना मिळणार आहे.
राज्य शासनाने पाच दिवसांचा आठवडा केल्याने रविवारी व शनिवारी सुटी असते. या दिवसांत छंद जोपासत विरंगुळा मिळविण्याचा बहुतांश जणांकडून प्रयत्न होत असतो. याशिवाय सण, उत्सव, राष्ट्रीय सण व स्थानिक प्रशासनाच्या सुटीकडे कर्मचाऱ्यांचे विशेष लक्ष असते. कार्यालयीन सुट्यांचा ताळमेळ बसवून शासकीय सुट्यांचा आनंद घेण्याचा प्रयत्नही अनेक जणांकडून आवर्जून होतो. पण, यंदा रविवारी पाच सुट्या आल्याने कर्मचाऱ्यांचा हिरमोडही झाला आहे.
नवे वर्ष होणार शुक्रवारपासून सुरू
सन २०२१ या नव्या वर्षातील पहिली शासकीय सुटी ही प्रजाकसत्ताक दिनी म्हणजेच २६ जानेवारीला मिळणार आहे. यानंतर १९ फेब्रुवारीला शिवजयंती शुक्रवारी आहे. याच दिवसाला लागून शनिवार, रविवार आहे. यापाठोपाठ २९ मार्चला होळीची सुटी सोमवारी आल्याने यामध्येही तीन दिवस सलग सुट्यांची पर्वणी मिळणार आहे. याशिवाय २ एप्रिल, सप्टेंबरमध्ये गणेश चतुर्थी व ऑक्टोबरमध्ये दसरा शुक्रवारी आल्याने त्यावेळी सलग सुट्यांचा आनंद शासकीय कर्मचाऱ्यांना मिळणार आहे. दिवाळीच्या सणात सरकारी कर्मचाऱ्यांची सुट्यांची दिवाळी साजरी होणार असल्याचे दिसून येत आहे. लक्ष्मीपूजन गुरुवारी, बलिप्रतिपदा शुक्रवारी व पुढील दोन दिवस असे चार दिवसांची सुटी सलगपणे उपभोगता येणार आहे. त्याच महिन्यात गुरू नानक जयंतीची सुटीही शुक्रवारीच आहे.