अमरावती : कोरोना संसर्गाच्या अडचणीमुळे काही शेतकरी पीक विम्यात सहभागी होऊ न शकल्याने आता २३ जुलैपर्यंत सहभाग घेता येणार आहे. यापूर्वी ही मुदत १५ जुलै होती. तसे आदेश कृषी विभागाचे सहायक आयुक्तांनी गुरुवारी जारी केले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत १,२५,११२ शेतकऱ्यांनी या योजनेत सहभाग नोंदविला आहे.
हवामान घटकांच्या प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास तसेच सर्वसाधारण क्षेत्राच्या ७५ टक्के क्षेत्रात पेरणी न झाल्यास, पिकांच्या हंगामध्ये पावसात खंड, पूर दुष्काळ आदींमुळे सरासरी उत्पादनात सरासरीच्या तुलनेत ५० टक्क्यांपेक्षा जास्त घट अपेक्षित असेल, तर विमा देय राहणार आहे. याशिवाय पीक पेरणीपासून काढणीपर्यंतच्या कालावधीत पिकांच्या उत्पादनात घट येणार असल्यास पिकांना विमा संरक्षण दिले जाते. यासाठी भरपाई वैयक्तिक स्तरावर पंचनामे करण्यात येऊन निश्चित करण्यात येणार आहे.
काढणीपश्चात नुकसान झाल्यास वैयक्तिक स्तरावर पंचनामे करण्यात येऊन नुकसानभरपाई देय राहणार आहे. मात्र, शेतकऱ्यांनी ७२ तासांपूर्वी याची माहिती कंपनी किंवा कृषी विभागाला कळविणे महत्त्वाचे असल्याचे कृषी विभागाने सांगितले. मुदतवाढ झाल्याने अधिकाधिक शेतकऱ्यांनी या योजनेत सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजय चवाळे यांनी केले आहे.
बॉक्स
- तर आत दिवस अगोदर घोषणापत्र आवश्यक
कर्जदार शेतकऱ्यांना योजनेत सहभागी होणे किंवा न होणे यासाठी पर्याय उपलब्ध आहे. जे कर्जदार शेतकरी विम्यात सहभागी होण्यास ईच्छूक नाहीत त्यांनी अंतिम मुदतीच्या सात दिवस अगोदर तसे घोषणापत्र बँकाना देणे महत्वाचे आहे. जे शेतकरी घोषणापत्र देणार नाहीत, त्यांच्या खात्यातून विमा हप्ता कपात करण्यात येणार असल्याचे कृषी विभागाने सांगितले.