उन्नत अभियान : आंतर मशागतीच्या अवजारांना प्राधान्य तिवसा : वाढत्या लोकसंख्येत घटत असलेली जमीनधारणा, बैलाची कमी झालेली संख्या, मजुरांची घटलेली संख्या, वाढते मजुरीचे दर, पेरणीचा अल्प कालावधी या पार्श्वभूमीवर कृषी यांत्रिकीकरणास यंदाच्या वर्षात चालना देण्यात येणार आहे. यामध्ये आंतरमशागतीसाठी लागणाऱ्या अवजारांना प्राधान्य देण्यात येणार आहे. यामध्ये ट्रॅक्टरसाठी कमाल १.२५ लक्ष रुपयांचे अनुदान शेतकऱ्यांना देय राहणार आहे. शेतकऱ्यांना ८ ते २० अश्वशक्ती इंजिन क्षमतेच्या ट्रॅक्टरच्या खरेदीसाठी प्रचलित योजनांतर्गत अनुज्ञेय असणारे अनुदान देण्यात येणार आहे. ज्या शेतकऱ्यांना २० एचपीपेक्षा अधिक व ७० एचपी इंजिन क्षमतेच्या मर्यादेपर्यंत ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी कमाल १.२५ लक्ष रुपयांच्या अनुदानाची मर्यादा देय राहणार आहे. प्रचलित योजनांमधील यांत्रिकीकरण घटकासाठी उपलब्ध असलेल्या एकूण निधीपैकी ६० टक्के निधी कृषीयंत्र व अवजारांच्या खरेदी करिता अनुदान देण्यासाठी मान्यता देण्यात आली आहे. याअंतर्गत पॉवर टिलर, रोटाव्हेटर, मोगडा, सर्व प्रकारचे प्लांटर, मळणी यंत्र, भात लावणी यंत्र, पॉवर विडर, रिपर मक बार्इंडर, भात मळणी यंत्र, मिनी दालमिल, दाल मिल, पूरक यंत्र, कापूस पऱ्हाडी श्रेडर, टॅक्टर चलीत फवारणी यंत्र आदी खरेदीसाठी शेतकऱ्यांना अनुदान देण्यात येणार आहे. या मोहिमेंतर्गत ट्रॅक्टर व यंत्र अवजारांची निवड करण्याचे संपूर्ण स्वातंत्र्य शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे. (प्रतिनिधी) २४ एप्रिल रोजी जाहिरात, २० दिवसांचा अवधी प्रचलित योजनांखालील यांत्रिकीकरणाच्या निधीतून ट्रॅक्टर व इतर यंत्रसामग्री उपलब्ध करण्यासाठी जिल्ह्यातील स्थानिक वर्तमानपत्रात २४ एप्रिल रोजी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांद्वारा जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार आहे. यामध्ये विविध योजनेकरिता जिल्ह्यास प्राप्त होणाऱ्या निधीच्या लक्ष्यांकाच्या मर्यादेत लाभार्थ्यांची निवड करण्यात येणार आहे व शेतकऱ्यांना अर्ज करण्यासाठी २० दिवसांचा अवधी देण्यात येणार आहे.
कृषी यांत्रिकीकरणात ट्रॅक्टरला १.२५ लक्ष अनुदान
By admin | Published: April 23, 2017 12:30 AM