गजानन मोहोड
अमरावती : धारणी तालुक्यातील साद्राबाडी येथे 25 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर या कालावधीत सौम्य स्वरूपाच्या भूकंपाचे 129 धक्के बसलेत. याची तीव्रता अधिकतम 2.3 रिश्टर स्केलपर्यंत नोंदविण्यात आली. स्थानिक भूगर्भातील हालचालींमुळे पाच किमी व्यासाच्या क्षेत्रात व किमान एक किमी खोलीवर आवाजासह ही कंपने असल्याचा अहवाल नवी दिल्ली येथील राष्ट्रीय भूंकप विज्ञान केंद्राचे (एनसीएस) हवामानशास्त्रज्ञ मनजितसिंग यांनी शासनाला दिला.
साद्राबाडी, झिल्पी, गौलानडोह व लगतच्या परिसरात सौम्य स्वरूपाच्या भूकंपामुळे हालचाल, धक्के व कंपने जाणवलीत. हा भूकंप स्वारोहनाचा (अर्थक्वेक स्वार्म) प्रकार असल्याची बाब या अहवालात नमूद करण्यात आलेली आहे. या ठिकाणी लावण्यात आलेले ‘अॅनालॉग सिस्मोग्राफ’ हे यंत्र आता बदलण्यात आले. त्याऐवजी ‘डिजिटल सिस्मोग्रॉफ’ यंत्र बसविण्यात आल्याने आता अतिसौम्य स्वरूपाच्या धक्क्यांची नोंदही घेण्यात येत आहे. यामध्ये भूगर्भातून येणारे आवाज हे किती खोलीवरून येत आहे, याचीही नोंद घेतली जात आहे. साद्राबाडी येथील भूगर्भातील हालचाली काही दिवस वा काही महिन्यांत कमी होतील. मात्र, अकोला, नागपूर, नर्मदानगर, लातूर, कराड, पुणे, मुंबई, भोपाल व गुणा येथील केंद्रावरून येथील हालचालींवर लक्ष ठेवणे महत्त्वाचे असल्याचे मत अहवालात नोंदविले आहे.मेळघाटातील साद्राबाडी व परिसरातील पाच गावांत दोन महिन्यांपासून भूगर्भातून मोठ्या आवाजासह प्रमाणावर कंपने नागरिक अनुभवत आहेत. 21 ऑगस्टला सर्वाधिक 2.5 रिश्टर स्केलचा धक्का बसला. त्यामुळे साद्राबाडी येथील काही घरांना भेगा पडल्या. भूकंपाच्या भीतीमुळे नागरिक स्थलांतरित होऊ लागल्यावर प्रशासनाला जाग आली. त्यानंतर भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभाग व भारतीय हवामान विभागाचे पथक अत्याधुनिक यंत्रासह तेथे डेरेदाखल झालेत.
नर्मदेच्या पूर्व-पश्चिम खोऱ्यात भूगर्भात हालचालीभूगर्भातील हालचाली या नर्मदेच्या पूर्व-पश्चिम खोºयात होत असल्याची बाब या अहवालात नमूद करण्यात आली. पेनीन्सुलार, रतलाम, खंडवा, नांदेड, छिंदवाडा, परभणी व पालघर जिल्ह्यातील जव्हार येथेही याच स्वरूपात भूकंप स्वारोहन झाल्याचे निरीक्षण शास्त्रज्ञांनी नोंंदविले. साद्राबाडी येथील सौम्य स्वरूपाचे धक्के हे भूकंप स्वारोहन असल्याचे या शास्त्रज्ञांनी स्पष्ट केले. 28 ऑगस्टला 2.3 रिश्टर स्केलची नोंदसाद्राबाडी व परिसरात 29 ऑगस्टला 15 धक्के बसलेत. याची ‘सिस्मोग्रॉफ’वर 2.3 रिश्टर स्केलपर्यंत नोंद झाली. दुसऱ्याचदिवशी 30 ऑगस्टला 1.5 रिश्टर स्केलपर्यंत 40 धक्के बसलेत. या आठ दिवसांत दररोज 1.5 रिश्टर स्केलचे 12 ते 15 धक्के या परिसरात बसले होते. पथकाने आठ दिवसांत 129 धक्क्यांचे निरीक्षण नोंदविले. मात्र, या दीड महिन्यात किमान 300 च्या वर धक्के बसल्याचे नागरिकांनी सांगितले.