लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : केवळ १२ वी पास तिही कला शाखेतून उत्तीर्ण करणाऱ्या एका महिलेने घरातच अॅक्युपंक्चर व नॅचरोपॅथी क्लिनिक उघडून डॉक्टरकीची प्रॅक्टिस चालविल्याचा धक्कादायक प्रकार येथील दहिसाथ भागात उघड झाला आहे. याप्रकरणी महापालिकेच्या भाजीबाजार शहरी आरोग्य केंद्रांचे वैद्यकीय अधिकारी फिरोजखान यांच्या तक्रारीवरून खोलापुरी गेट पोलिसांनी २३ जुलै रोजी आरोपी महिलेविरुद्ध वैद्यकीय व्यवसाय अधिनियम १९६१ च्या कलम ३३, ३४, ३६ व ३८ अन्वये गुन्हा दाखल केला. ती महिला गेल्या चार वर्षांपासून तेथे डॉक्टरकी करण्याची कुठलीही डिग्री वा डिप्लोमा नसताना प्रॅक्टिस करत असल्याचे महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या पाहणीदरम्यान उघड झाले होते.
मुंबईस्थित महाराष्ट्र काउन्सिल ऑफ इंडियन मेडिसिनच्या प्रबंधकांनी १० जून २०२४ रोजी महापालिकेला त्यांच्या क्षेत्रातील बोगस डॉक्टरविरुद्ध कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार एक ३० वर्षीय महिला जिच्याकडे कुठलिही वैद्यकीय शैक्षणिक पात्रता अथवा डिप्लोमा वा डिग्री नसताना ती अॅक्युपंक्चर नॅचरोपॅथीद्वारे सामान्यांवर डॉक्टर असल्याचे भासवून उपचार करीत असल्याची माहिती प्राप्त झाली होती.
त्यानुसार भाजीबाजार शहरी आरोग्य केंद्रांचे वैद्यकीय अधिकारी फिरोजखान, डॉ. निगार खान, रूपेश खडसे यांनी पोलिसांचे सहकार्य घेऊन ३ जुलै रोजी दुपारी त्या ३० वर्षीय महिलेने दहिसाथ परिसरात थाटलेले क्लिनिक गाठले होते. तेथे पथकाला सुजोग अॅक्युपंक्चर नॅचरोपॅथी क्लिनिक असा बोर्ड आढळून आला त्यावर गर्दन का दर्द, नसो का दुखना कमर का दर्द, गॅप, फ्रैक्चर या ऑपरेशन के बादवाली जखम, घुटनो का दर्द थायराइड, मधुमेह, मोटापा, मानसिक असंतुलन, वांग, सायटिका, डीटॉक्स यह बिमारी पर इलाच किया जाता है असे लिहिलेले आढळून आले.
बेसिक लेवल सर्टिफिकेट पथकाने त्या क्लिनिकमध्ये प्रवेश केला असता तेथे अॅक्युपंक्चर नीडल्स, मॅग्नेट, गोल मैग्नेट पेंचेस, बॉडी डेहॉक्स मशीन, सर्क्युलेशन मशीन, स्टीम लेटिंग मशीन या वस्तू मिळून आल्या. तेथील स्वतःला डॉक्टर म्हणवून घेणाऱ्या महिलेने त्यांच्याकडे इंटरनॅशनल सुजोग असोसएशनचे सुजोग थेरपी इंडक्शन बेसिक लेवलचा कोर्स केलेले सर्टिफिकेट दाखवले. त्याची पथकाने तपासणी केली असता सत्य बाहेर आले.
व्हिजिटिंग कार्ड, फलकावरही डॉक्टरत्या महिलेकडे वैद्यकीय शैक्षणिक पात्रता असलेले कोणतेही प्रमाणपत्र नसताना सुद्धा व्हिजिटिंग कार्डवर व दवाखान्याच्या बोर्डवर त्यांनी स्वतःच्या नावासमोर डॉक्टर लिहिले असून त्याखाली डायनस सुजोक अॅक्युपंक्चर नॅचरोपॅथी, थेरपी असे लिहिलेले दिसून आले. त्या महिलेकडे कुठलीही डॉक्टर पदविका नसताना त्या प्रॅक्टिस करत असल्याने निरीक्षण नोंदवत ते महाराष्ट्र काउन्सिल ऑफ इंडियन मेडिसिनच्या आदेशाचे उल्लंघन करणारे आहे, असे डॉ. फिरोजखान यांनी तक्रारीत नमूद केले.
"खोलापुरी गेट ठाण्याच्या हद्दीत क्लिनिक थाटणाऱ्या त्या महिलेकडे वैद्यकीय शैक्षणिक पात्रता वा डिग्री आढळली नाही. मात्र, त्यांनी व्हिजिटिंग कार्ड व नामफलकावर स्वतःच्या नावासमोर डॉक्टर लावलेले आढळले. २३ जुलै रोजी गुन्हा दाखल झाला आहे."- डॉ. विशाल काळे, एमओएच