(प्रादेशिक पानाकरिता)
अमरावती : कोरोना संसर्ग झालेल्या काही रुग्णांना पुन्हा ‘म्युकरमायकोसिस’ या पोस्ट कोविड आजाराचा सामना करावा लागत आहे. पश्चिम विदर्भात या आजाराने आतापर्यंत २१५ रुग्ण बाधित झाले व उपचारादरम्यान १३ रुग्णांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, २१५ रुग्णांपैकी १४० रुग्ण उपचारानंतर बरे झाले. याशिवाय २६ रुग्ण शासकीय रुग्णांलयांमध्ये ७ वैद्यकीय महाविद्यालयात व २९ खासगी रुग्णांलयांमध्ये उपचारार्थ दाखल आहेत.
मृतांमध्ये अकोला जिल्ह्यातील सर्वाधिक ५ रुग्ण आहेत. याशिवाय अमरावती जिल्ह्यात १, बुलडाणा ४, वाशिम २ व यवतमाळ जिल्ह्यात १ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झालेला आहे. शासनस्तरावर या आजाराविषयी गांभीर्य बाळगले जात आहे. या आजाराचा रुग्ण उपचारार्थ आला असता त्या रुग्णांची माहिती जिल्हा शल्यचिकित्सकांना देणे बंधनकारक केलेले आहे. याशिवाय आ आजाराच्या माहितीविषयी खासगी डॉक्टरांच्या कार्यशाळादेखील घेण्यात येत आहे. सर्वच जिल्हाधिकाऱ्यांद्वारा म्युकरमायकोसिस विषयी नियमित आढावा घेण्याच्या सूचना आरोग्य विभागाद्वारा देण्यात आलेल्या आहेत.
नाक, कान, घसा व नेत्र तज्ज्ञांशी याविषयी संपर्क साधला असता, या आजाराविषयी रोज किंवा एक दिवसाआठ एक तरी उपचारार्थ येत असल्याचे सांगण्यात आले व विभागात सद्यस्थितीत किमान एक हजारावर तरी रुग्ण असावेत, अशी शक्यता त्यांनी वर्तविली आहे.
‘म्युकरमायकोसिस’ची जिल्हानिहाय स्थिती
आरोग्य विभागाच्या अहवालानुसार अमरावती जिल्ह्यात १०९ रुग्णांची नोंद झाली. यामध्ये एका रुग्णांचा मृत्यू झाला. अकोला जिल्ह्यात ६६ रुग्णांची नोंद झाली. यात ५ रुग्णांचा मृत्यू झालेला आहे. यवतमाळ जिल्ह्यात १२ रुग्णांची नोंद झाली. यामध्ये एका रुग्णाचा मृत्यू झाला. बुलडाणा जिल्ह्यात आतापर्यंत २३ रुग्णांची नोंद झाली. यामध्ये ४ रुग्णांचा मृत्यू झालेला आहे. याशिवाय वाशिम जिल्ह्यात ९ रुग्णांची नोंद झाली व २ रुग्णांचा मृत्यू झालेला आहे.