मोहन राऊत ।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : आठवडाभरात दोन माणसे व पाच जनावरांना ठार करणारा नरभक्षक वाघ एका वासराला ठार करीत जामडोह मोहाडी जंगलातून भरकटला आहे. त्यामुळे अमरावती, नागपूर, वर्धा या जिल्ह्यांतील १३ तालुक्यांमध्ये वाघाचे सावट कायम आहे.एकीकडे वनविभाग शिकार केलेल्या जागेवरच घेराबंदी घालत आहे. दुसरीकडे हा वाघ २० किमीचा पल्ला गाठत असल्याने या वाघाला जेरबंद करायचे कसे, असा सवाल वनविभागालाच सतावत आहे. चंद्रपूरच्या जंगलातून थेट वर्धा, अमरावती जिल्ह्यात आलेल्या या साडेतीन वर्षांच्या नरभक्षक वाघाचा स्वभाव कसा आहे, ज्या भागात एवढी वर्षे हा वाघ होता, तिथे काही मानवी शिकार त्याने केली का, याची माहिती अद्याप वनविभागाजवळ नाही. धामणगाव रेल्वे, तिवसा व आता मोर्शीकडे प्रस्थान करणाऱ्या या वाघाला सध्या तरी सुसह्य अधिवास मिळालेला नसल्याने त्याची भटकंती सुरू आहे.वाघ भांबोरात येण्याची शक्यतामोर्शी : आठ दिवसांपासून धामणगाव, तिवसा तालुक्यात धुमाकूळ घालत असलेल्या वाघाने मोर्शी तालुक्याच्या दिशेने वाटचाल केल्याची माहिती सोशल मीडियावरून व्हायरल झाल्याने मोर्शी तालुक्यात त्याची दहशत निर्माण झाली. त्या वाघाला तातडीने जेरबंद करण्याची मागणी परिसरातील नागरिक करीत आहेत.नरभक्षक वाघ तळेगाव ठाकूर येथून भांबोरा जंगलात शिरल्याची माहिती मिळताच वनविभागासह पोलीस ताफा त्या दिशेने रवाना झाला. सार्शी शिवारात बांधलेल्या गाईला त्याने ठार केले. मात्र, त्याचे पुढील वास्तव्य कुठे असेल, याबाबत वनकर्मचाºयांना सुगावा लागू शकलेला नाही. त्यामुळे तो या परिसरात धुमाकूळ घालू शकतो, याचा अंदाज लावून वनविभागातर्फे भांबोरा, येवती, सार्शी, पिंपळखुटा परिसरातील गावांत मुनादीद्वारे सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तो परत तळेगाव ठाकूरकडे येण्याची शक्यता नागरिक मोहन साबळे यांनी वर्तविली आहे.नरभक्षक वाघ मोर्शी तालुक्यातगोहृयाची शिकार : परिसरात दहशत; शेतकरी, शेतमजूर घरीचनेरपिंगळाई : आठ दिवसांपासून धामणगाव रेल्वे व तिवसा तालुक्यात धुमाकूळ घालणारा नरभक्षक वाघ शुक्रवारी मोर्शी तालुक्यात दाखल झाला. नेरपिंगळाई परिसरात मोहाडी सालेमपूर शिवारात रात्री त्याने शेतात बांधलेल्या गोहृयाची शिकार केली. त्यामुळे परिसरात दहशतीचे वातावरण आहे.धामणगाव रेल्वे तालुक्यातील मंगरूळ दस्तगीर व अंजनसिंगी येथील मानवी शिकार आणि तीन पाळीव प्राण्यांना ठार केल्यानंतर त्या नरभक्षक वाघाने मोर्शी तालुक्यात कूच केली आहे. नेरपिंगळाई परिसरातील मोहाडी सालेमपूर शिवारात शुक्रवारी रात्री प्रवीण बरडे यांच्या शेतातील गोऱ्हाला ठार केले.कर्मचाऱ्यांचा ताफा दाखलपरीसरात वाघाचा शोध घेण्याकरिता ५० वनकर्मचारी व शार्प शूटर दाखल झाले असून, वृत्त लिहिस्तोवर नरभक्षक वाघाचा शोध लागलेला नव्हता.शेतकरी-मजूर धास्तावलेपरिसरात ओलिताची शेती असून, मोठ्या प्रमाणात भाजीपाला व कपाशीचा पेरा आहे. या घटनेने संपूर्ण नेरपिंगळाई परिसरात दहशतीचे वातावरण असून, शेतमजूर, शेतकरी शेतात जाण्यास धजावत नाहीत. नेरपिंगळाई परिसरात कपाशीचा पेरा मोठ्या प्रमाणात असून, सद्यस्थितीत कापूस वेचणीला आला आहे.सोशल मीडिया सक्रियवाघ गावाशेजारी आल्याच्या भीतीने कामे ठप्प असून, गावात चौकाचौकांमध्ये वाघाबद्दलच चर्चा रंगत आहेत. सोशल मीडियावरही कंड्या पिकविल्या जात असून, बहुतांश अफवा असल्याचे पुढे आले आहे.तीन जिल्ह्यांत भीती कायमधामणगाव तालुका पार करीत कुऱ्हा, वऱ्हा, मार्डी मार्गे चिरोडी जंगलात या वाघाला सुरक्षित आश्रय मिळाला असता. वनविभागाचा हा प्रयत्न फसला आणि या नरभक्षक वाघाने सातपुडाकडे प्रस्थान केले. या वाघामुळे आताही अर्धा अमरावती जिल्हा दहशतीखाली आहे. धामणगाव रेल्वे, तिवसा, चांदूर रेल्वे मोर्शी, वरुड या तालुक्यांमध्ये वाघाचा पुन्हा उद्रेक होऊ शकतो. वर्धा जिल्ह्यातील खरांगणा, मोरांगणा, आष्टी, आर्वी, तळेगाव ठाकूर या भागातही शिरकाव कधीही होऊ शकतो. काटोल, नरखेड, कळमेश्वर तालुक्यांतही वाघ मार्गक्रमण करू शकतो, अशी माहिती एका अनुभवी अधिकाºयाने दिली.'तो' वाघ जामडोल परिसरातआठ दिवसांपासून धुमाकूळ घालून नागरिकांना दहशतीत ठेवणारा तो नरभक्षक वाघ शनिवारी सायंकाळी ७.२१ वाजता दरम्यान पिंगळाई गडाच्या मागील जामडोल परिसरात असल्याची माहिती वरूड वनक्षेत्र अधिकारी ठाकरे यांनी दिली. त्याला जेरबंद करण्याच्या हिशेबाने वनविभागाचा ताफा जामडोल परिसरात तैनात केला असून, ट्रँक्यूलाइझ करून त्याला पिंजऱ्यात कैद करण्याचे नियोजन वनविभागाने आखले आहे.अनुभवी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची वानवावाघ जेरबंद करण्यासाठी कोणते औषध, किती प्रमाणात लागते, वाघ जेरबंद होऊन बेशुद्ध झाला, तर औषधोपचार कसा करायचा, यासाठी प्रथमश्रेणी पशुवैद्यकीय अधिकाºयांची गरज असते. मात्र, एका सामाजिक संस्थेशी संलग्न डॉक्टरला या कोम्बिंग आॅपरेशनमध्ये सोबत ठेवण्यात आले आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मर्जीने हा पोरकट खेळ वनविभागात सुरू आहे. वाघ आणि माणसांच्या जिवाएवढीच वाघाचे संरक्षण करणाºया वनविभागाच्या ढिसाळ कार्यप्रणालीची दखल वनमंत्र्यांनी घ्यावी, अशी मागणी केली जात आहे
१३ तालुक्यांत वाघाची दहशत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2018 9:39 PM
आठवडाभरात दोन माणसे व पाच जनावरांना ठार करणारा नरभक्षक वाघ एका वासराला ठार करीत जामडोह मोहाडी जंगलातून भरकटला आहे. त्यामुळे अमरावती, नागपूर, वर्धा या जिल्ह्यांतील १३ तालुक्यांमध्ये वाघाचे सावट कायम आहे. एकीकडे वनविभाग शिकार केलेल्या जागेवरच घेराबंदी घालत आहे.
ठळक मुद्देजंगलाचा राजा भरकटला : वनविभागाची शिकारीच्या ठिकाणी घेराबंदी, वाघाचा दररोज १८ किमी प्रवास