(फोटो मेलवर झेडपी सभा नावाने आहे)
अमरावती : जिल्हा परिषदेच्या विशेष सर्वसाधारण सभेत सुमारे १३० कोटी रुपयांच्या जिल्हा नियोजन विकास आराखड्याच्या प्रस्तावावर दहा मिनिटांत बहुमताने शिक्कामोर्तब करण्यात आले. विशेष म्हणजे, आतापर्यंत निधीच्या मुद्यावर नेहमी होणारा आरडाओरडा न होता, समन्वय ठेवून विकासकामे व निधी वितरणाचे नियोजन सभेत झाले.
जिल्हा परिषदेला दरवर्षी विविध विकासकामांसाठी तसेच शासकीय योजनांकरिता जिल्हा नियोजन समितीकडून कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला जातो. त्यानुसार सन २०२०-२१ या आर्थिक वर्षातील विकासकामांचे नियोजन करण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्याचा नियोजन आराखडा तयार केला आहे. या आराखड्यानुसार २० जानेवारी रोजी जिल्हा परिषदेच्या डॉ. पंजाबराव देशमुख सभागृहात अध्यक्ष बबलू देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या विशेष सभेत १०६ कोटी ७५ लक्ष १८ हजार रुपयांचा विकास आराखडा प्रस्ताव सभापटलावर ठेवला होता. यामध्ये जनसुविधा योजनेसाठी ४ कोटी ५१ लाख, आयुर्वेदिक दवाखान्याचे बांधकाम ५२.५८ लाख, प्राथमिक आरोग्य केंद्र बांधकाम ३ कोटी १६ लाख, उपकेंद्र बांधकाम ४ कोटी ७४ लाख, अंगणवाडी बांधकाम ४ कोटी ९६ लाख, महिला व बाल कल्याणच्या योजनांकरिता ८२ लाख, कोल्हापुरी बंधाऱ्याकरिता ४ कोटी २० लाख, औषधी पुरठ्याकरिता ६० लाख, शाळा दुरुस्ती १३५७.३५ लाख, तर शाळा बांधकामाकरिता १३४३.२५ लाख रुपयांचे नियोजन केले आहे. तीर्थक्षेत्र विकासाकरिता ७ कोटी ७५ लाख, ग्रामीण रस्ते २६ कोटी, तर इतर जिल्हा मार्गाच्या रस्त्यासाठी १८ कोटी आणि आदिवासी उपयोजनेंतर्गत ४ कोटी ५० असे एकूण १०६ कोटी ७५ लाख रूपयाच्या नियोजनावर विशेष सभेत शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. याव्यक्तिरिक्त महिला व बाल कल्याण, आरोग्य विभागासाठी अतिरक्त प्रत्येकी आठ कोटी व रस्ते विकासाकरिता ५ कोटी मिळून १३० कोटी रुपयांच्या नियोजन प्रस्तावास मंजुरी प्रदान केली आहे.
सभेला अध्यक्ष बबलू देशमुख, उपाध्यक्ष विठ्ठल चव्हाण, सभापती बाळासाहेब हिंगणीकर, दयाराम काळे, पूजा आमले, सदस्य प्रताप अभ्यंकर, रवींद्र मुंदे, महेंद्रसिंह गैलवार, जयंत देशमुख, नितीन गोंडाणे, सुनील डिके, सुहासिनी ढेपे, पूजा हाडोळे, वासंती मंगरोळे, सुरेश निमकर, प्रकाश साबळे यांच्यासह सीईओ तुकाराम टेकाळे, कॅफो चंद्रशेखर खंडारे व सर्व खातेप्रमुख उपस्थित होते.
बॉक्स
ऑफलाईन सभेला लक्षणीय उपस्थिती
आठ महिन्यानंतर २० जानेवारी रोजी पार पडलेल्या विशेष सभा फिजिकल डिस्टन्सिंग पाळून ऑफलाईन घेण्यात आली. या सभेला सर्वच सदस्यांनी हजेरी लावली.
बॉक्स
प्रियंका दगडकर यांना श्रद्धांजली
जिल्हा परिषद बांधकाम व शिक्षण सभापती प्रियंका दगडकर यांचे निधन झाले. सभेत अध्यक्ष बबलू देशमुख यांनी शोकप्रस्ताव मांडला. यावेळी उपस्थितीत पदाधिकारी, अधिकारी यांची दोन मिनिटे मौन पाळून श्रद्धांजली वाहिली.