मोर्शी (अमरवाती) : अवैध तांदळाचा साठा केलेल्या गोदामावर महसूल खात्याच्या अधिकाऱ्यांनी पोलिसांसमवेत धाड टाकून एकूण १३१ क्विंटलचे २६२ कट्टे जप्त केले. गोदामाला सील ठोकण्यात आले आहे. ही कारवाई ५ फेब्रुवारी रोजी रात्री १० च्या सुमारास करण्यात आली.
पोलिस सूत्रांनुसार, मोर्शी येथील आठवडी बाजार स्थित एका गोडाऊनमध्ये तांदळाची साठवणूक केल्याची गोपनीय माहिती तहसीलदार सागर ढवळे यांना दूरध्वनीवरून प्राप्त झाली. त्यांनी महसूल सहायक प्रकाश पुनसे यांना माल जप्त करून योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानुसार पुनसे यांनी ठाणेदार श्रीराम लांबाडे यांना सोबत घेऊन शहराच्या मध्यभागी आठवडी बाजारातील रंजित अग्रवाल याच्या मालकीच्या गोडाऊनवर धाड टाकून २६२ कट्टे तांदूळ जप्त केला. यानंतर गोडाऊन सील करण्यात आले. या धाडसी कारवाईमुळे अवैध तांदूळ खुल्या बाजारात विकणाऱ्या व्यापाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.
तांदळाचे कट्टे ६ फेब्रुवारी रोजी तहसील कार्यालयाच्या अखत्यारीतील शासकीय गोदामात ठेवण्यात आला. त्याचा नमुना हा प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे. अहवालाअंती तो साठा रेशनचा कंट्रोलचा आहे की कसे, याबाबत खुलासा होईल. त्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल, असे अन्नपुरवठा निरीक्षक विलास मुसळे यांनी सांगितले.