पान २ ची बॉटम
मोहन राऊत
धामणगाव रेल्वे : गत पाच वर्षांत वैद्यकीय उपचारांच्या खर्चात झालेली भरमसाठ वाढ व औषधांचा हजारोंचा खर्च पाहता लॉकडाऊनच्या काळात गत वर्षात शहर व ग्रामीण भागातील तब्बल १३१ महिलांनी प्रसूतीसाठी धामणगावच्या ग्रामीण रुग्णालयाला प्राधान्य दिले आहे.
येथील ग्रामीण रुग्णालयाशी धामणगाव तालुक्यातील ६५ ग्रामपंचायती जुळल्या आहेत. गत एक वर्षापासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खासगी रुग्णालयात प्रसूती करणे अवघड होत आहे. त्यात जिल्हा स्तरावर खासगी रुग्णालयात प्रसूतीचा सामान्यतः खर्च १५ ते ५० हजार रुपयांपर्यंत येतो. सोबतच सिझरदेखील अधिक वाढली आहे. त्यामुळे सर्वसामान्य कुटुंबातील महिलांना ६० ते ७० हजार रुपये खर्च परवडेनासा झाला आहे. याउलट जिल्हा तथा तालुका स्तरावरील सरकारी रुग्णालयातील अस्वच्छता, डॉक्टरांची अनुपस्थिती, औषधांचा तुटवडा हे चित्र काळानुसार बदलून आता जिल्ह्यातील सार्वजनिक आरोग्यसेवा बळकट झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांसह अनेक मोठ्या श्रीमंत कुटुंबातील महिलांनीही प्रसूतीसाठी ग्रामीण रुग्णालयाला प्राधान्य दिले आहे.
बॉक्स
महिलांची संपूर्ण तपासणी
येथील ग्रामीण रुग्णालयात गर्भवती महिला व प्रसूतीसाठी आलेल्या महिलांची प्रथम कोरोना चाचणी घेतली जाते. लगेच १० मिनिटात अहवाल मिळताच उपचाराला सुरुवात करण्यात येते. येथील ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. महेश साबळे यांच्या नेतृत्वात डॉ. आकाश येडे, डॉ. पवन सव्वालाखे, अस्मित चौधरी आशिष पाटील, वैशाली नगराळे, अंजली गभणे, गौरी डेकाटे, निपुर बगाडे, दर्शना घोडके, वैष्णवी पाटणकर, वंदना जाधव, राजेंद्र जगताप यांच्या अथक परिश्रमाने या ग्रामीण रुग्णालयात यशस्वी प्रसूतीचे प्रमाण अधिक वाढले.
कोट
मागील एका वर्षात येथील ग्रामीण रुग्णालयात १३१ महिलांची यशस्वीपणे प्रसूती झाली आहे. गर्भवती महिलांची वेळोवेळी झालेली आरोग्य तपासणी, त्यात योग्य औषधोपचार व वैद्यकीय चमूच्या मिळालेल्या सहकार्यामुळे हे यशस्वी झाले आहे.
- डॉ. महेश साबळे,
वैद्यकीय अधीक्षक ग्रामीण रुग्णालय धामणगाव रेल्वे