अमरावती : शहर आयुक्तालयातील ‘टिम क्राईम ब्रॅच’ने दोन सराईत चोरांकडून तब्बल १३.५० लाख रुपये किमतीच्या दुचाकींसह दोन ऑटो जप्त केले. १५ नोव्हेंबर रोजी ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली असून, एक जण अद्याप फरार आहे.
गुन्हे शाखेचे पथक १५ नोव्हेंबर रोजी पेट्रोलिंग करीत असतांना दोन इसम चित्रा चौकात चोरीची एक मोटर सायकल घेऊन येत असल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यावरून तेथे सापळा रचला असता मोहम्मद अबुजर अब्दुल कलिम (१९) व अब्दुल तहेसिम अब्दुल फईम (१९, दोघेही रा. बिस्मिला नगर, अमरावती) यांना थांबवून त्यांची चौकशी करण्यात आली.
चौकशीदरम्यान, त्यांच्या ताब्यातून शहर कोतवाली पोलीस ठाण्यात नोंद गुन्हयातील चोरीला गेलेली दुचाकी मिळून आली. त्यामुळे दोघांनाही त्या गुन्हयात अटक करण्यात आली. त्यांना शहरातील चोरीच्या वाहनांबाबत अधिक विचारपुस केली असता त्यांनी अमरावती शहरसह नागपुर शहरातून वाहने चोरल्याची कबुली दिली. त्यांच्या ताब्यातून ५.५० लाख रुपये किमतीच्या ११ दुचाकी व ८ लाख रुपये किमतीचे व दोन प्रवासी ऑटो जप्त करण्यात आले. अन्य एका साथीदारासह आपण ते गुन्हे केल्याची कबुली त्यांनी दिली. तो फरार असला, तरी त्याला अटक केली जाणार आहे. पोलीस कोठडीदरम्यान वाहनचोरीचे आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.
टीम क्राईमचे यश
पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अर्जुन ठोसरे यांच्या नेतृत्वात सहायक पोलीस उपनिरीक्षक संजय वानखडे, पोहेकॉ जावेद अहेमद, अजय मिश्रा, नापोकॉ दिपक सुंदरकर निलेश पाटील, इजाज शहा, गजानन लुटे यांनी केली. गेल्या काही दिवसांपासून शहरात वाहनचोरीचे सत्र सुरू आहे.