गजानन मोहोड, अमरावती : डिसेंबर २०२२ मध्ये झालेल्या २५७ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत १३६४ उमेदवारांनी विहीत कालावधीत उमेदवारी खर्च सादर केला नाही. या उमेदवारांवर आता अपात्रतेची टांगती तलवार आहे.
ग्रामपंचायत निवडणुकीत थेट सरपंच व सदस्य पदांकरिता ५४६५ उमेदवार रिंगणात होते व मतमोजणीची प्रक्रिया २० डिसेंबरला पूर्ण झाली होती. त्यामुळे २१ जानेवारी २०२३ पर्यंत या सर्व उमेदवारांनी तहसीलदारांनी प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्याकडे उमेदवारी खर्च सादर करणे अनिवार्य होते. प्रत्यक्षात विहीत कालावधीत ४,१०१ उमेदवारांनीच उमेदवारी खर्च सादर केलेला आहे. त्यामुळे उर्वरीत १३६४ उमेदवारांना जिल्हा निवडणूक विभागाद्वारा नोटीस बजावण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
खर्च सादर न करणारे तालुकानिहाय उमेदवार
जिल्हा निवडणूक विभागाने दिलेल्या माहितीनुसार अमरावती तालुक्यात २२, भातकुली २९, तिवसा २२, चांदूर रेल्वे २७, नांदगाव खंडेश्वर ३७, धामणगाव रेल्वे १३, मोर्शी १४६, वरुड ५८, दर्यापूर ४५, अंजनगाव सुर्जी ११, अचलपूर १३४, चांदूरबाजार २०२, धारणी ३०० व चिखलदरा तालुक्यातील ३१८ उमेदवारांवर आता अपात्रतेची टांगती तलवार आहे.