लोकमत न्यूज नेटवर्कवरूड : तालुक्यातील एका गावातील १४ वर्षीय मुलीचा मध्य प्रदेशात जुन्नारदेव तालुक्यातील एका गावात २०२१ मध्ये बालविवाह करण्यात आला. त्या बालिकेसोबत तिच्या आरोपी पतीने बळजबरीने शारीरिक संबंधदेखील प्रस्थापित केले. याप्रकरणी वरूड पोलिसांनी १४ मे रोजी तिचे बळजबरीने लग्न लावून देणाऱ्या तिच्या आईसह, पती, सासू, मामा व मध्यस्थी करणाऱ्यांसह एकूण पाच जणांविरुद्ध भादंविचे कलम कलम ३७६(३), ३४, पॉस्को, बाल विवाह प्रतिबंधक अधिनियमानुसार गुन्हा दाखल केला. हा सर्व घटनाक्रम १ एप्रिल २०२१ ते १२ मे २०२२ दरम्यान घडला. वरूड पोलिसांनी गुन्हे दाखल करून ती केसडायरी छिंदवाडा जिल्ह्यातील नवेगाव पोलीस ठाण्यात वर्ग केली आहे. पोलीस सूत्रांनुसार, तालुक्यातील एका गावातील १४ वर्षीय मुलीचा तिची आई आणि मामाने डिसेंबर २०२१ मध्ये जबरदस्तीने मध्य प्रदेशात विवाह करून दिला. तेथे त्या मुलीवर शारीरिक अत्याचार करण्यात आला. सबब, सासरच्या लोकांच्या त्रासाला कंटाळून ती माहेरी आली. इकडे माहेरी आईने नवऱ्याकडे का जात नाही, म्हणून तिला मारहाण सुरू केली. अखेर २२ एप्रिल रोजी तिने वरूड पोलीस ठाणे गाठले. आपबीती पोलिसांना सांगितली. यानंतर महिला पोलिसांकडून तपास करून पोलीस अधीक्षक आणि एसडीपीओ यांच्या मार्गदर्शनाखाली १४ मे रोजी सायंकाळी ६.४४ वाजता उशिरा गुन्हा दाखल केला.
यांच्याविरुद्ध गुन्हा : १४ वर्षीय पीडिताच्या तक्रारीवरून तिची आई, मामा लालमन छन्नू बगाहे (रा. सिंदरेही, माधव ठाणा, नवेगाव, छिंदवाडा), तिचा पती दुर्गेश रामदास बेले, एक महिला व या बालविवाहात मध्यस्थी करणारा उमेश बेले (तिघेही रा. छिपना पिपरिया, ठाणा बोरदेही, ता. छिंदवाडा) या पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. घटनास्थळ मध्य प्रदेशातील असल्याने तो गुन्हा जुन्नरदेव तालुक्यातील नवेगाव पोलीस ठाण्यात हस्तांतरित करण्यात आला. अल्पवयीन मुलीला बाल सुधारगृहात पाठविले आहे.
अल्पवयीन मुलीची तिची आई व मामाने फसवणूक केली. तिला मानसिक व शारीरिक छळाला सामोरे जावे लागले. कुणी ऐकत नसल्याने तिने पोलिसांची मदत घेतली. गुन्हा दाखल करून सामाजिक भावनेने मदत केली. पोलिसांमुळे तिचे प्राण वाचले.- प्रदीप चौगावकर, ठाणेदार