अमरावती : पोलीस आयुक्त आरती सिंह यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपायुक्त विक्रम साळी यांनी प्रत्येक पोलीस ठाण्याला भेटी देऊन आढावा घेतला. त्यांना अनेक वाहने बेवारस स्थितीत आढळून आली. आता शासकीय प्रक्रिया पूर्ण करून त्या वाहनांची विल्हेवाट लावण्यात येणार आहे.
सदर वाहनांची विल्हेवाट लावण्याची मोहीम पोलीस उपायुक्तांनी हाती घेतली आहे. बेवारस वाहनांमध्ये राजापेठ ठाण्यात १७, सिटी कोतवाली २२, खोलापुरी गेट १६, गाडगेनगर १६, वलगाव १०, नागपुरी गेट २०, फ्रेजरपुरा १३, नांदगाव पेठ ९, व बडनेरा १९ असे एकूण १४२ वाहने पोलिसांना बेवारस स्थितीत आढळून आली. त्या वाहनांची संपूर्ण माहिती शहर पोलीस दलाच्या वेबसाईटवर अपलोड करण्यात आली आहे. ज्यांची ती वाहने असतील त्यांनी संबंधित पोलीस ठाण्यात मालकी हक्काबाबतची कागतपत्र सादर करून आपली मालकी सिद्ध करावी, असे आवाहन पोलिसांनी केले. अन्यथा सर्व वाहनांचा महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ८५ व ८७ प्रमाणे जाहीर लिलाव करण्यात येणार असल्याचे पोलीस उपआयुक्त (एडमिन) विक्रम साळी यांनी स्पष्ट केले. या संदर्भाचे पत्रकही गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक कैलास पुंडकर यांनी जारी केले आहे.