अमरावती :हुंडाविरोधी कायदा कडक असूनही त्याची अंमलबजावणी मात्र प्रभावीपणे होत नसल्याने विवाहिता हुंडाबळी ठरत आहेत. सन २०२२ मध्ये एकूण १४४ विवाहिता हुंडाबळी ठरल्या. राज्य शासनाने मार्च महिन्यात ही आकडेवारी जाहीर केली असून, सुमारे ७४ महिलांचा अनैतिक व्यापार झाल्याचेही हा अहवाल सांगतो.
सन २०२० मध्ये १९७ हुंडाबळी गेले. त्यापेक्षा सन २०२१ मध्ये बळींची संख्या कमी असली तरी त्या वर्षातील १७२ हा आकडा देखील धक्कादायक आहे. या संपूर्ण प्रकरणांमध्ये सासरच्या मंडळीविरुद्ध भादंवि कलम ३०४ ब अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले. मात्र, अशा हुंडाबळीच्या प्रकरणांमध्ये ८६ टक्के गुन्हेगार पुराव्याअभावी निर्दोष सुटतात, असेे पोलिसांचे निरीक्षण आहे.
गुन्हा कितीही गंभीर आणि क्रूर असो, कायदा पुरावा मागतो आणि पुराव्याअभावी केलेले आरोप न्यायालयात सिद्ध होत नाहीत. याचा अर्थ, पुरावे नीट गोळा करणे व असलेले पुरावे नष्ट करण्याची संधी आरोपीला न देणे, या कर्तव्यात प्रशासन व पोलिस कमी पडतात अन् त्यामुळे की काय, काय होते, बघून घेऊ, या मानसिकतेत वाढ झाल्याचे दिसून येते. परिणामी, राज्यभरात गतवर्षी तब्बल १४४ विवाहितांच्या आत्महत्या वा मृत्यूबाबत हुंडाबळीच्या कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले.
काय आहे हुंडाबळी?
भारतीय दंड विधानात ३०४ ब हे नवे कलम घालण्यात आले. या कलमात 'हुंडाबळी'ची व्याख्या आहे. जेव्हा एखाद्या विवाहितेचा मृत्यू भाजल्यामुळे वा शारीरिक इजा झाल्यामुळे आणि असाधारण परिस्थितीत विवाहापासून सात वर्षांच्या आत झाला असेल, तसेच मृत्यूपूर्वी तिचा शारीरिक व मानसिक छळ झाल्याचे सिद्ध झाल्यास तो मृत्यू 'हुंडाबळी' समजण्यात येतो.
परिपत्रकाची अंमलबजावणी कागदावरच
अनेक वर्षांच्या पाठपुराव्यानंतर महाराष्ट्र सरकारने हुंडा प्रतिबंधक कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी २८ जुलै २००६ रोजी परिपत्रक काढले. त्यानुसार विशेष अभियान चालविणे अपेक्षित होते. परंतु ती अंमलबजावणी केवळ कागदावर राहिली. या परिपत्रकानुसार २६ नोव्हेंबर हा दिवस 'हुंडाबंदी दिन’ म्हणून साजरा व्हावा आणि पुढील सात दिवस त्याबाबत जनजागरण अपेक्षित आहे. मात्र, तेदेखील कागदावरच आहे.
वर्षभरात तब्बल १४४ विवाहिता हुंडाबळी ठरणे ही अतिशय धक्कादायक बाब आहे. स्त्रीला कुटुंबात सर्वार्थाने समान वागणूक आणि आदर सन्मान देण्याचे संस्कार मुलांवर लहानपणापासून स्वतःच्या कृतीतून देणे गरजेचे आहे.
- पूनम पाटील, सहायक पोलिस आयुक्त, अमरावती