लोकमत न्यूज नेटवर्कधारणी : गुजरातला चांगल्या पगाराच्या नोकरीच्या आमिषातून नेण्यात आलेल्या मेळघाटातील १५ मुलांना धारणी पोलिसांच्या सहकार्याने परत आणण्यात आले. बुधवारी ती आपआपल्या गावी परतली.मेळघाटातील हरिसाल व दुनी या गावातील अल्पवयीन १५ मुलांना किरकोळ कामातून जादा मोबदल्याच्या आमिषाने गुजरातेतील अहमदाबादच्या काही व्यावसायिकांनी आपल्या कारखान्यात कामासाठी बोलावले होते. मात्र, तेथे गेल्यानंतर फसवणूक झाल्याचे त्यांना कळले. अतिशय कष्टाचे काम व अल्प मजुरी दिली जात असल्याने त्यांनी कारखानदारांना परत जाण्याची परवानगी मागितली. मात्र, त्यांना परवानगी व पैसेदेखील नाकारण्यात आले. ही बाब या मुलांनी आपल्या पालकांना कळविली. आपण कुठे काम करीत आहोत, कंपनीचे नाव, पत्ता हेदेखील या मुलांना माहिती नव्हते.घाबरलेल्या पालकांनी हरिसाल येथील सामाजिक कार्यकर्ते ऋषिकेश खिल्लारे यांना ही माहिती दिली. खिल्लारे यांनी डॉ. रवींद्र कोल्हे यांना सविस्तर कळविले. त्यांच्यामार्फत नाशिक येथील समाजसेवक प्रसाद समर्थ आणि अहमदाबाद येथील उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते आशुतोष जानी यांच्याशी संपर्क करण्यात आला. ही मुले काम करीत असलेल्या कारखान्यांचा शोध घेतल्यानंतर धारणी पोलिसांत खिल्लारे यांनी माहिती दिली. त्यानंतर गुजरात पोलिसांशी संपर्क साधून सर्व मुलांची सुटका करण्यात आली. आशुतोष जानी यांनी सर्व मुलांची ट्रॅव्हल्सने खंडवा येथे रवानगी केली. बुधवारी सकाळी सर्व मुले धारणी पोलीस ठाण्यात पोहोचली. तेथून त्यांना पालकांच्या स्वाधीन करून आपआपल्या गावी रवाना करण्यात आले असल्याची माहिती ठाणेदार विलास कुलकर्णी यांनी दिली.
गुजरातमधून परत आणली मेळघाटातील १५ मुले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2018 10:21 PM
गुजरातला चांगल्या पगाराच्या नोकरीच्या आमिषातून नेण्यात आलेल्या मेळघाटातील १५ मुलांना धारणी पोलिसांच्या सहकार्याने परत आणण्यात आले. बुधवारी ती आपआपल्या गावी परतली.
ठळक मुद्देआॅपरेशन मुस्कान : धारणी पोलिसांची मोहीम