अमरावती : शहरात वेगवेगळ्या ठिकाणी वीज विभागाद्वारा धाडसत्र राबवीत डिसेंबरच्या १५ दिवसात १५ लाखांची वीजचोरी उघड करण्यात आली. यात मीटरमध्ये फेरफार, रिमोटचा वापर करणाऱ्या ५४ प्रकरणांचा समावेश आहे.
यात काही ग्राहकांनी वीजचोरीपोटी ८.२१ लाख रुपये भरून त्यांच्याविरूध्द करण्यात येणारी फौजदारी कारवाई थांबविली, तर दंडासहीत वीजचोरीची रक्कम न भरणाऱ्याविरुध्द विद्युत कायदा २००३ नुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केल्याचे कार्यकारी अभियंता अमरावती शहर आनंद काटकर यांनी सांगितले.
अमरावती शहरात वीज चोरीविरुध्द राबविण्यात येणाऱ्या मोहिमेला गती देत डिसेंबरच्या १५ दिवसात शहरात वेगवेगळ्या संशयित ठिकाणी तपासणी करण्यात आली. यात ५४ ठिकाणांवर ७९,५२४ युनिटची आणि एकूण १५.१ लाख रुपयांची वीजचोरी झाल्याचे उघडकीस आले आहे.
मीटरमध्ये फेरफार करून मीटर बंद पाडणे किंवा मीटरची गती मंद करणे, मीटर बंद पाडण्यासाठी रिमोट कंट्रोलचा वापर करणे, मीटरलाच बायपास करणे, मीटरच्या मागील बाजूस छीद्र पाडून मीटरमध्ये रेजीस्टंट निर्माण करणे आदी गैरप्रकार या तपासणीत निदर्शनास आले आहेत. याव्यतीरिक्त थकबाकीमुळे वीजपुरवठा खंडित केलेल्या ग्राहकांनी थकीत बिलाचे पैसे न भरता परस्पर वीजपुरवठा सुरू करून घेणे, तसेच चोरून आकोडे टाकून वीजचोरी केल्याचे प्रकारही समोर आले आहे. याहीपुढे ही मोहीम सुरूच राहणार असल्याचे वीज विभागाने सांगितले.
उपविभाग २ मध्ये सर्वाधिक चोरी
शहरात तपासणी दरम्यान उघडकीस आलेल्या अनधिकृत वीज वापरात अमरावती महावितरणच्या शहर उपविभाग २ मध्ये सर्वाधिक एकूण २८ प्रकरणांचा समावेश असून, त्याठिकाणी ३७,७३७ युनिटची वीजचोरी होत असल्याचे आढळले आहे. ६.६६ लाखांच्या या वीजचोरीपोटी ३.३१ लाखांचा भरणा संबंधितांकडून करण्यात आलेला आहे. शहर उपविभाग ३ मधील १७ प्रकरणांत २०,४८७ युनिट आणि ३.५५ लाखाची वीज चोरी झाल्याचे निष्पंन्न झाले आहे. तर,शहर उपविभाग १ मध्ये ९ ठिकाणी अनधिकृत वीजवापर होत असल्याचे आढळले आहे. २१३०० युनिट आणि ४.८० लाखाच्या या वीज चोरीपैकी ४.४५ लाख रुपयांचा भरणा करण्यात आला आहे.