हरिशांती कॉलनीत दरोडेखोरांचा धुमाकूळरहिवासी भयभीत : दोन घरांमधून पाच लाखांचा मुद्देमाल लंपास, मारहाण करून दिल्या धमक्या बडनेरा / अमरावती : शहरातील विरळ वस्ती असलेल्या हरिशांती कॉलनीत रविवारी मध्यरात्री आठ ते दहा दरोडेखोरांनी अक्षरश: धुमाकूळ घातला.लाठ्या-काठ्यांच्या जोरावर रहिवाशांना धमकावत दोन घरांमधून पाच लाखांचा मुद्देमाल चोरून नेला. तर इतर दोन घरांमध्ये दरोडेखोरांचा चोरीचा प्रयत्न फसला. या थरारक घटनेमुळे रहिवाशी भयभीत झाले असून शहरात खळबळ उडाली आहे. साईनगर ते अकोली मार्गानजीकच्या परिसरात हरिशांती कॉलनी आहे. येथे विरळ वस्ती आहे. या कॉलनीत मोजकी १० ते १५ घरे आहेत. रविवारी रात्री १.४५ वाजताच्या सुमारास सर्वप्रथम दरोडेखोरांनी रामचंद्र निर्मलकुमार मुलचंदानी यांच्या घरात प्रवेश केला. रामचंद्र मुलचंदानी यांचे वडिल निर्मलकुमार व आई ज्योती मध्य प्रदेशातील दुर्ग येथे नातेवाईकांच्या भेटीला गेले होते. घरात रामचंद्र एकटेच होते. हिच संधी हेरून मध्यरात्री अनवाणी पायाने, केवळ चड्डी घालून आठ ते दहा दरोडेखोरांनी हातात काठ्या व दगड घेऊन घराचे दार ठोठावले. बडनेरा / अमरावती : रामचंद्र यांनी दार न उघडल्याने दरोडेखोरांनी मोठ्या दगडाने दार तोडून टाकले. रामचंद्र यांना मारहाण करीत त्यांना ओढणीने बांधून ठेवले आणि त्यांच्या घरातील दागिने व इतर ऐवज हुडकण्यास सुरूवात केली. चोरट्यानी ५ तोळ्यांच्या सोन्याच्या बांगड्या, २ अंगठ्या, गोफ, नेकलेस व ३० हजारांच्या रोख रकमेसह एक मोबाईल असा एकूण ५ लाखांचा मुद्देमाल चोरून नेला. त्यानंतर दरोडेखोरांनी त्यांचा मोर्चा सुधीर रामकृष्ण वडस्कर (४०) यांच्या घराकडे वळविला. त्यांच्या घराचे दार दगडाने तोडून चोरटे आत शिरले. वडस्कर कुटुंबातील सदस्यांना काठी व दगडांचा धाक दाखवून घरातील पैसे व दागदागिने देण्यास सांगितले. दरोडेखोरांच्या भीतीने वडस्कर कुटुंबियांनी घरातील सर्व पैसे व दागदागिने असा एकूण ५० हजारांचा मुद्देमाल काढून दरोडेखोरांच्या स्वाधिन केला. त्यानंतर दरोडेखोरांनी शेजारीच राहणाऱ्या करण आर. गंगन यांच्या घरात शिरण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या दारासमोरील लावलेले लोखंडी ग्रील तोडण्याचा प्रयत्न दरोडेखोरांनी केला. जोरजोरात ओरडून गंगन यांना दार उघडण्यास सांगितले. मात्र, त्यांनी दार न उघडल्याने दरोडेखोरांनी त्यांच्याच शेजारी राहणाऱ्या आकाश जितेंद्र कारूष (२३) यांचे घर गाठले. मुलचंदानी यांच्या घरावर दरोडा पडल्यानंतर रामचंद्र मुलचंदानी यांनी कारूष यांना फोन करून दरोडेखोरांविषयी माहिती देऊन त्यांचे घर गाठले होते. ते कारूष यांच्या घरी कुटुंबातील सदस्यांसह एका खोलीत लपून बसले. दरोडेखोरांनी काही वेळातच कारूष यांच्या घराचे दार चोरीच्या उद्देशाने तोडून आत प्रवेश केला व घरात पैसे व दागिन्यांचा शोध घेतला. मात्र, हाती काहीच लागले नाही. त्यामुळे दरोडेखोरांनी काढतापाय घेतला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळ गाठून चौकशी सरू केली. घटनास्थळी श्वानपथक व ठसे तज्ज्ञांच्या मदतीने तपासकार्य सुरूहोते. हरिशांती कॉलनीत रविवारी मध्यरात्री चार घरांवर दरोडा पडल्याने रहिवासी धास्तावले आहेत. मध्यरात्री १.४५ वाजता सुरू झालेला हा थरार ३ वाजता थांबल्यानंतर रहिवाशांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली. विरळ वस्त्यांमधील नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. हरिशांती कॉलनीत रामचंद्र मुलचंदानी, आकाश कारूष, रुपचंद गंगन व सुधीर वडस्कर यांच्या घरावर दरोडा पडला. मध्यरात्रीच्या अंधारात दरोडेखोरांचा धुमाकूळ पाहून अन्य रहिवासी धास्तावले होते. दरोडेखोर आता आपल्या घरापर्यंत पोहोचतील, या भीतीने सगळ्यांची गाळण उडाली होती. मुलचंदानींच्या घरासमोर राहणारे पारवे कुटुंबिय खिडकीतून दरोडेखोरांचा धुमाकूळ उघड्या डोळ्यांनी बघत होते. त्यांनी तत्काळ या घटनेची माहिती मध्यरात्री १.५४ वाजता पोलीस नियंत्रण कक्षाला दिली. दरम्यानच्या १५ मिनिटांच्या कालावधीत दरोडेखोरांनी चार घरांवर धावा बोलून चोरी केलीच. पोलीस घटनास्थळी येताच नागरिकांना धीर आला. त्यांनी पोलिसांना घटनाक्रम सांगितला. आबालवृद्ध भीतीच्या सावटात आहेत. पोलिसांनी तपासाची सूत्रे हलविली असून दरोड्याविषयी अन्य पोलीस यंत्रणेला माहिती देण्यात आली आहे. (प्रतिनिधी)घटनास्थळी पोलीस आयुक्तांची भेटपोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक बाहेरगावावरून शहरात दाखल होताच त्यांनी थेट घटनास्थळ गाठले. सोबतच पोलीस उपायुक्त शशिकुमार मीना, सहायक पोलीस आयुक्त मिलिंद पाटील यांनीही घटनास्थळ गाठून घटनेचा आढावा घेतला. पोलीस आयुक्त व मीना यांनी रहिवाशांसोबत संवाद साधून घटनेविषयी सर्व तथ्ये जाणून घेतली. त्यानुसार अधिकाऱ्यांना तपासाच्या दृष्टीने योग्य ते निर्देश दिलेत. यावेळी बडनेरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिलीप पाटील यांच्यासह गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल किनगे, एपीआय कांचन पांडे, पोलीस उपनिरीक्षक गणेश अहिरे आदी कर्मचारी घटनास्थळी पोहोचले होते. झांबुवा, पारधी, शिकलकरी टोळीवर संशयज्या पद्धतीने दरोडेखोरांनी चोरी केली त्याच पद्धतीची चोरीची घटना नागपूरमध्ये दोन-तीन दिवसांपूर्वी घडली. एकाचवेळी चार ते पाच घरांना लक्ष्य करून चोऱ्या करण्याचे त्यांचे वैशिष्ट्य आहे. मध्य प्रदेशातील झांबुवा, पारधी व शिकलकरी टोळी सुद्धा अशाच प्रकारे दरोडे टाकत असल्याने या घटनेबाबत या टोळ्यांवर संशय व्यक्त केला जात आहे. या टोळीतील सदस्य अंगाला तेल माखून चोरी करतात. यापूर्वीच्या घटनांमध्ये तसे उघडकीस आले आहे. ब्लँकेट विकणाऱ्यांवर संशयहरिशांती कॉलनीत बाहेरच्या अनोळखी व्यक्तिंचा वावर होता काय, याबाबत चौकशी केली असता शनिवारी सकाळी ९.३० वाजता पाच ते सहा जण ब्लँकेट विकण्यासाठी आल्याची माहिती सुजीत उदासे नामक युवकाने दिली. त्यामुळे ब्लँकेट विक्रेत्यांवरही संशय व्यक्त केला जात आहे. दरोडेखोरांचा आरडाओरडदरोडा टाकल्यानंतर नागरिकांमध्ये भीती निर्माण करण्याच्या उद्देशाने दरोडेखोरांनी आरडाओरडा केला. हिंदीत संभाषण करणारे दरोडेखोर त्यांच्या हातातील टॉर्चचा प्रकाश नागरिकांच्या चेहऱ्यावर टाकत होते. स्वत:च चोर-चोर असा आरडाओरडा करीत होते. दार उघडा अन्यथा मारहाण करू, अशी धमकी देत असल्याची माहिती स्थानिक रहिवाशांनी पोलिसांना दिली. बाहेरून बंद केले दरवाजे दरोडेखोरांनी दरोडा टाकण्यापूर्वी परिसरातील सर्व घरांची दारे बाहेरून बंद केली. त्यानंतर त्यांनी दरोड्याचे सत्र सुरु केले. दार ठोठावण्याचे आवाज, दार तोडण्याचे आवाज अनेकांना ऐकू आले. मात्र, घराचे दार बाहेरून बंद असल्याने नागरिक घराबाहेर पडू शकले नाहीत.
नागरिकांनी अनुभवला १५ मिनिटांचा थरार
By admin | Published: October 04, 2016 12:07 AM