अमरावती : लोकसभा निवडणुकीतील मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी प्रशासनाच्या वतीने विविध उपाययोजना तसेच जनजागृती कार्यक्रम देखील राबविण्यात येत आहे. परंतु, जे मतदार आपल्या आरोग्याच्या समस्येमुळे रुग्णालयात उपचार घेत आहेत, त्यांचे मतदान कसे होणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. प्रशासनाच्या वतीने या रुग्णांच्या मतदानासंदर्भात कोणतीही उपाययोजना राबविण्यात आलेली नाही. जिल्ह्यातील सर्व शासकीय व खासगी रुग्णालयांची संख्या लक्षात घेता १५ हजारांच्या जवळपास रुग्ण हे उपचारार्थ रुग्णालयात भरती असल्याची प्राथमिक माहिती आहे.
लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव म्हणजेच लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने अमरावती मतदारसंघासाठी २६ एप्रिल रोजी मतदान प्रक्रिया होत आहे. ही निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडावी यासाठी प्रशासन यंत्रणा पूर्णपणे सज्ज आहे. तसेच मतदानाची टक्केवारी वाढविण्याच्या दृष्टीने निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार प्रशासनाच्या वतीने मोठ्या प्रमाणावर मतदान जनजागृती मोहीम देखील राबविण्यात आली.
तसेच मतदानाच्या अधिकारापासून कोणीही वंचित राहू नये यासाठी दिव्यांग तसेच ८५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या वयोवृद्ध मतदारांच्या घरी जाऊन प्रशासनाने मतदान प्रक्रिया देखील राबविली. परंतु रुग्णालयात उपचारार्थ भरती असलेल्या रुग्णांच्या मतदानासाठी कोणतीही उपाययोजना प्रशासनाच्या वतीने राबविण्यात आलेली नसल्याचे बोलले जात आहे. अमरावती जिल्ह्यातील ९ तालुके हे अमरावती मतदारसंघात असून, ५ तालुके वर्धा मतदारसंघात आहेत. त्यामुळे येथील शासकीय व खासगी रुग्णालयात उपचारासाठी भरती असलेले रुग्ण हे मतदानापासून वंचित राहणार का, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. जिल्ह्यात २४ शासकीय रुग्णालयेअमरावती जिल्ह्यात २४ शासकीय रुग्णालये आहेत तर ६० प्राथमिक आरोग्य केंद्रे आहेत. तर खासगी रुग्णालयांची संख्या देखील शंभरापेक्षा अधिक आहे. त्यामुळे येथे उपचारार्थ भरती रुग्णांची संख्या ही १५ ते २० हजारांच्या जवळपास असून, ते मतदानाच्या मूलभूत अधिकारापासून वंचित राहण्याची शक्यता आहे. प्रत्येक रुग्णाच्या सेवेत घरातील एक व्यक्ती व्यस्तरुग्णालयात उपचारार्थ भरती असलेल्या रुग्णांच्या सेवेमध्ये त्या रुग्णांच्या घरातील किमान एक तरी व्यक्ती व्यस्त असते. त्यामुळे रुग्ण सेवेत व्यस्त असलेल्या व्यक्ती देखील मतदानापासून वंचित राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. गर्भवती महिलाही राहणार मतदानापासून वंचितजिल्हा स्त्री रुग्णालय तसेच अचलपूर येथील स्त्री रुग्णालय येथे शेकडो महिला गर्भवती महिला उपचारासाठी भरती असतात. त्यामुळे या महिलांनाही मतदान केंद्रावर पोहोचणे शक्य नाही. याचबरोबर क्षयरोग तसेच इतर संसर्गजन्य आजाराचे रुग्ण देखील मतदान केंद्रावर जाऊन मतदान करू शकत नाही. त्यामुळे प्रशासनाकडून या रुग्णांसाठी मतदानाची विशेष सुविधा होणे आवश्यक आहे.