सत्यप्रतींचा अट्टाहास : अधिकाऱ्यांवर रोषलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : राज्य शासनाच्या ‘स्टेट कॉमन एन्ट्रन्स सेल मुंबई’च्यावतीने बीएडच्या प्रवेशासाठी आॅनलॉईन सीईटी परीक्षा आयोजित करण्यात आली होती. मात्र, लांबवरून ही परीक्षा देण्याकरिता आलेल्या विद्यार्थ्यांकडे ऐनवेळी ओरिजिनल फोटो आयडीची मागणी करून तब्बल १५ विद्यार्थ्यांना बीएड प्रवेश परीक्षेपासून वंचित ठेवण्यात आले. विद्यार्थ्यांची विनवणी धुडकावलीअमरावती : यामुळे विद्यार्थ्यांमध्ये परीक्षा केंद्रावरील अधिकाऱ्यांबद्दल रोष व्यक्त केला जात आहे. परीक्षेला येताना सर्वच विद्यार्थ्यांकडे ‘हॉल तिकिट’होते. आधारकार्डच्या झेरॉक्स कॉपी सुद्धा विद्यार्थ्यांनी आणल्या होत्या. परंतु ऐनवेळी फोटो आयडीच्या सत्यप्रतींची मागणी करून विद्यार्थ्यांना परीक्षा देण्यास मज्जाव करण्यात आला. विद्यार्थ्यांनी गळ घालून, विनवण्या करून पाहिल्या. मात्र, त्यांना परीक्षेला बसू देण्यात आले नाही. परिणामी तब्बल १५ ते २० विद्यार्थ्यांना परीक्षेपासून वंचित रहावे लागले. परीक्षा केंद्रावर काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. हा प्रकार सकाळी ११.३० वाजता येथील नादगांव पेठ नजीकच्या ‘इआॅन डिजीटल झोन’ या परीक्षा केंद्रावर घडला. आम्हाला परीक्षेला बसू द्यावे, अशी विनंती विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावरील श्रीखंडे नामक अधिकाऱ्यांना विनंती केली. परंतु ‘हॉल तिकिट’वरच आधारकार्ड किंवा इतर ओरिजिनल फोेटो आयडी आणणे अनिवार्य असल्याची सूचना लिहिली असल्याने विद्यार्थ्यांना फोटो आयडीच्या सत्यप्रती दाखविल्याशिवाय परीक्षेला बसू देता येणार नाही, असे संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे जिल्ह्याबाहेरून तसेच ग्रामीण भागातून परीक्षा देण्यासाठी आलेल्या भावी विद्यार्थ्यांना आल्या पावली परत जाण्याखेरीज कोणताही पर्याय उरला नाही. त्यामुळे त्यांना परिक्षेपासून वंचीत राहण्याची वेळ आली आहे. त्यामुळे निराश झालेल्या विद्यार्थ्यांनी लोकमशी संपर्क साधला. लोकमतने ही माहिती जिल्हाधिकारी अभिजीत बांगर यांना दिली. जिल्हाधिकाऱ्यांनी याप्रकरणाची माहिती घेऊन तातडीने कारवाई करण्याचे आश्वासन दिले. विद्यार्थ्यांनी देखील कारवाईची अपेक्षा व्यक्त केली आहे. याप्रकरणाबाबत सहसंचालक उच्चशिक्षण, अमरावती विभाग व केंद्रप्रमुखांशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही. आम्ही हॉल तिकिट व आधारकार्डच्या झेरॉक्स आणल्या होत्या. आम्ही त्यांना आॅनलाईन परीक्षेला बसू देण्याची विनंती केली. तरीही १५ ते २० विद्यार्थ्यांना परीक्षेपासून वंचित ठेवण्यात आले. - विजय बेलसरे, विद्यार्थी, वरूड याप्रकरणाची माहिती मिळाली असून निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश देऊ. - अभिजित बांगर, जिल्हाधिकारी अमरावती.
ओळखपत्राअभावी ‘सीईटी’ला मुकले १५-२० विद्यार्थी
By admin | Published: May 15, 2017 12:03 AM