अमरावती : खरे तर जिल्हा बॅंकेत संचालक म्हणून मंत्री, आमदारांनी लढणे योग्य नाही. ही निवडणूक कार्यकर्त्यांची आहे. मात्र, बॅंकेच्या अध्यक्षांनी १५० कोटींचे कर्ज शेतकऱ्यांना तर, ७०० कोटी रुपये दलालांमार्फत कंपनीला दिले आहेत. बॅंकेत झालेला गैरव्यवहार निखंदून काढणे आणि शेतकऱ्यांचे लचके तोडणाऱ्यांना त्यांची
जागा दाखविण्यासाठी ही निवडणूक लढवित असल्याची ग्वाही राज्यमंत्री तथा संचालकपदाचे उमेदवार बच्चू कडू यांनी दिली.
जिल्हा बॅंक ही गाव, खेड्यात पोहोचली आहे. मात्र, चुकीच्या लोकांच्या हाती बॅंकेचा कारभार गेल्याने ही बॅंक आता शेतकऱ्यांनी नव्हे तर कंपनी, दलालांची झाली आहे. निवडणुकीत मदत न करणाऱ्या ६५ सोसायट्या जिल्हा बॅंकेच्या अध्यक्षांनी अवसायनात काढल्या, असा आराेप ना. कडू यांनी केला. बॅंकेचा अध्यक्ष हा बेकायदेशीर सावकार असेल, यापेक्षा शेतकऱ्यांचे दुर्दैव असू शकत नाही, असा टोलाही त्यांनी लगावला. बॅकेने कर्ज द्यावे, यासाठी शेतकरी आंदोलन करीत आहे. एमपीए ५२ टक्क्यावर गेला. बॅंकेचा घोटाळा, अपहार हा संचालकांनीच बाहेर काढला. बॅंकेच्या अध्यक्षांनी शेतकऱ्यांचे लचके तोडले, असा आरोप ना. कडू यांनी केला. संचालकांची बैठक पाच मिनिटात आटोपत असेल, तर कारभार कसा सुरू आहे, हे दिसून येते. ही निवडणूक शेतकरी हितासाठी लढविली जात आहे. शेतकऱ्यांना कर्ज वाटप नाही, शेतकरी उपोषण आणि दलालांमार्फत कंपन्यांमध्ये गुंतवणूक वाढली, असा ठपका अधिकाऱ्यांनी ऑडिटमध्ये ठेवल्याचे ना. बच्चू कडू सांगितले.
--------------------
दोषींची आता सुटका नाही : प्रताप अडसड
जिल्हा बॅंकेत अपहार, घोटाळा झाला, हे आता कागदोपत्री स्पष्ट झाले आहे. ही निवडणूक संचालकपदासाठी नव्हे तर शेतकरी हितासाठी लढविली जात आहे. सत्ताधाऱ्यांनी ११ वर्षापर्यंत शेतकऱ्यांचे लचके तोडले आहेत. ३.४९ कोटी ही अपहाराची रक्कम फार लहान आहे. बॅंकेत मोठा अपहार झाला असून, आता दोषींची सुटका नाही, असा दावा आमदार प्रताप अडसड यांनी केला आहे. माझ्या पत्रानंतर बॅंकेत चौकशी, ईडी, ऑडिट सुरू झाले. ५ ते ७ कोटींचे सॉफ्टवेअरचे घबाड असल्याचा आरोप आमदार अडसड यांनी केला.
---------------------
बंटी, बबलीचे कारस्थान उघड करू: हर्षवर्धन देशमुख
जिल्हा बॅंकेची निवडणूक ही बंटी, बबलीचे कारस्थान थांबविण्यासाठी लढविली जात आहे. बॅंकेचा व्यवहार हा शेतकऱ्यांसाठी चालावा, यासाठी ही लढाई आहे. आता भ्रष्टाचाराचा डंख शिट्टी वाजवून थांबविणार असल्याचे श्री. शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांनी सांगितले. ही लढाई भ्रष्टाचाराविरोधी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.