अंजनगाव सुर्जी : शहराच्या ठिकाणी क्रीडा संकुल नसून जागेअभावी क्रीडासंकुलचे बांधकाम प्रलंबित आहे अंजनगाव सुर्जी येथील अंजनगाव सुर्जी येथे क्रीडा संकुल बांधकामाचा प्रस्ताव शासनाकडे जागेअभावी प्रलंबित होता. तालुका क्रीडा संकुलासाठी नगर परिषोच्या ठरावाप्रमाणे शहराच्या विस्तारित डेव्हलपमेंट प्लॅनमध्ये मौजा खेल हिराजी सर्वे न १७/१ मधील आरक्षण क्र. ४ नुसार १.५० हेक्टर जागा तालुका क्रीडा संकुलाकारिता आरक्षित केली आहे.
सदर जागेची मोजणी करून देण्यात आली असून, कृषी विभागाच्या नाहरकत प्रमापत्रामुळे सदर जागेचा ताबा क्रीडा विभागाला मिळला नाही. याबाबत आमदार बळवंत वानखडे यांनी शासनस्तरावर लेखी पाठपुरावा केला. परंतु कृषी विभागाचा ताबा क्रीडा संकुलास देण्याबाबत शासनस्तरावर निर्णय होणे आवश्यक होते. याबाबत वारंवार कृषिमंत्री पालकमंत्री क्रीडा मंत्री यांच्याकडे आ. बळवंत वानखडे यांनी लेखी पाठपुरावा केला.
याबाबत बुधवारी मंत्रालयात ना.सुनील केदार, ना. यशोमती ठाकूर यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. यात कृषी विभाग अंजनगाव सुर्जीच्या ताब्यातील १.५० हेक्टर जागा क्रीडा संकुल बांधकामासाठी देणेबाबत मंत्रीमहोदयानी कृषी विभागास सूचित केले. सदर बैठकीला आ.बळवंत वानखडे, माजी आमदार वीरेंद्र जगताप, धीरज कुमार, आयुक्त कृषी, क्रीडा आयुक्त ओमप्रकाश बकोरिया, जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव आदी दूरचित्रवाणी परिषदेमार्फत उपस्थित होते.