अमरावती : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने ग्रामीण भागातही चांगलेच हातपाय पसरले. मात्र, प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवित जिल्ह्यातील ६४ ग्रामपंचायत क्षेत्रातील १५० गावांनी कोरोना गावाच्या वेशीवर रोखण्यात यश मिळविले. दुसरी लाट ओसरत असली तरी यापुढेही खबरदारीच्या उपाययोजनांची अंमलबजावणी सुरू ठेवण्याचा निर्णय ग्रामपंचायतींनी घेतला आहे.
देशभरात मार्च २०२० पासून कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढला. जिल्ह्यात एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कोरोनाचा पहिला रुग्ण शहरात आढळला होता. अशातच पहिल्या लाटेत ग्रामीण भागात जनजीवन प्रभावित झाले नाही. पहिल्या व दुसऱ्या लाटेत आतापर्यंत ९५ हजार ३८२ रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. ९२ हजार ६९३ जणांनी कोरोनावर मात केली आणि १५३६ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. अशातच आता गत काही दिवसांपासून कोरोना विषाणूचा संसर्ग बराच कमी झाला आहे.
कोरोना संसर्गाच्या पहिल्या लाटेत जिल्ह्यातील ३२० ग्रामपंचायतींची ७२६ गावे कोरोनापासून दूर होती. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत १०१ ग्रामपंचायत क्षेत्रातील २२६ गावांनी कोरोनाला गावाच्या वेशीवर रोखले. कोराेना दोन्ही लाटा जिल्ह्यातील ६४ ग्रामपंचायतींमधील १५० गावांनी वेशीवर रोखल्याची माहिती जिल्हा परिषद प्रशासनाच्या अहवालात म्हटले आहे.
बॉक्स
दोन्ही लाट रोखणाऱ्या गावांची संख्या
अचलपूर १२, अमरावती ११, भातकुली १९, अंजगाव सुर्जी १, चांदूर बाजार १४, चिखलदरा १५, चांदूर रेल्वे १, दर्यापूर १९, धारणी १९, धामणगाव रेल्वे ३, मोर्शी ११, नांदगाव खंडेश्वर १२, तिवसा १ आणि वरूड १० अशा ६४ ग्रामपंचायतींमधील १५० गावांनी कोरोनाला वेशीवर रोखले आहे.