अमरावती : देश आणि समाजाने आम्हाला जी संधी, सुविधा दिल्या, त्यांची परतफेड हे आमचे कर्तव्य आहे. कोरोना संसर्गात शैक्षणिक योग्यतेनुसार काय करू शकतो, हा विचार चमकला आणि सर्व विरोध, भय दूर सारून विद्यापीठाच्या कोरोना लॅबमध्ये स्वॅब तपासणीसाठी टेक्निकल असिस्टंट पदासाठी १६ जणी पुढे आल्या. कोरोनाने दहशत पसरविली असताना, या संसर्गाशी थेट दोन हात करण्याचे त्यांचे धैर्य कौतुकास्पदच आहे.
कोविड-१९ मॉलिक्यूलर डायग्नोस्टिक लॅबमध्ये १६ महिला-युवती कोरोनाचा पॉझिटिव्ह-निगेटिव्ह अहवाल देण्यासाठी स्वॅब नमुने तपासणीत अहोरात्र कार्यरत आहेत. टेक्निकल ऑफिसर डॉ. निरज घनवटे यांच्या नेतृत्वात प्रज्ञा साऊरकर, पूजा मांडविया, अमृता कासुळकर, रेश्मा धर्माळे, निकिता धर्माळे, राधिका लोखंडे, मयूरी गहरवाल, निकिता पेटे, अर्पणा जाधव, श्रुतिका दभाड, शुभदा माहुरे, कृतिका देशमुख, नेहा काले, नीलू सोनी और शरयू यांनी या लॅबमधून मे-२०२० पासून आतापर्यंत १ लाख २० हजार नमुने तपासले. वेगवेगळ्या जिल्ह्यांतून आलेल्या या महिला ॲनालिस्ट वेगवेगळ्या शिफ्टमध्ये चोख काम करीत असल्याचे नोडल अधिकारी डॉ. प्रशांत ठाकरे म्हणाले. महिलांना समान संधी हा हक्कच आहे, असे महिला दिनाच्या अनुषंगाने या १६ जणींनी ‘लोकमत’ला ठामपणे सांगितले.