अमरावती : मध्य रेल्वेचे महाप्रबंधक सुनीलकुमार सूद हे १५ जानेवारी रोजी बडनेरा दौऱ्यावर आले होते. प्रसंगी रेल्वेस्थानकावर जवळपास १६ विविध रेल्वे गाड्यांना थांबे देण्याची मागणी खा. आनंदराव अडसूळ यांच्यामार्फत तसेच विविध संघटनांनीसुद्धा निवेदनाद्वारे केली आहे. बडनेरा रेल्वेस्थानक हे जंक्शन रेल्वेस्थानक म्हणून ओळखले जाते. या ठिकाणाहून दररोज लांबपल्ल्याच्या रेल्वेगाड्या धावतात. मात्र लांबपल्ल्याच्या गाड्यांना बडनेऱ्यात थांबा नसल्यामुळे प्रवाशांची चांगलीच गैरसोय होते. त्यामुळे या रेल्वेस्थानकाच्या विकासासह याठिकाणी नागपूर दुरांतो प्रिमियम एक्स्प्रेस, भुवनेश्वर-मुंबई, पुरी-मुंबई, गोवाहटी-पुरी, हावडा-शिर्डी, सुरत-पुरी, गांधीधाम-पुरी, एलटीटी-पुरी, एलटीटी-गोवाहटी, विशाखापट्टणम-एलटीटी, हावडा-पुणे अशा विविध गाड्यांना बडनेरा रेल्वेस्थानकावर थांबे देण्यात यावे, जेणेकरून अमरावतीसह लगतच्या जिल्ह्यातील प्रवाशांनाही याचा मोठा फायदा होऊन रेल्वेच्या उत्पन्नातही भर पडू शकते. याशिवाय अमरावती-बडनेरा, नवी अमरावती-चांदूरबाजार, चांदूररेल्वे येथील रेल्वे प्रवाशांच्या विविध समस्यासुद्धा महाप्रबंधकांसमोर मांडण्यात आल्या. अमरावती-नरखेड रेल्वे मार्गावरील अमरावती-चांदूरबाजार येथे संगणकीकृत आरक्षण केंद्र सुरू करावे अशी मागणी महाप्रबंधकांकडे खासदारांनी केली.
बडनेरा रेल्वेस्थानकावर हवे १६ गाड्यांना थांबे
By admin | Published: January 17, 2015 10:50 PM