अमरावती : जिल्ह्यातील बँकांद्वारा मे महिन्यापासून यंदाच्या खरीप हंगामासाठी पीककर्जाचे वाटप करण्यात येणार आहे. यावर्षी जिल्हा समितीद्वारा बँकांना १६०० कोटी रुपयांच्या पीककर्जाचे लक्ष्यांक निश्चित करण्यात आलेले आहे. जिल्हा बँक ही सेवा सहकारी सोसायटीच्या माध्यमातून तर राष्ट्रीयीकृत बँका थेट शेतकऱ्यांना पीककर्ज वाटप करणार आहेत.
गतवर्षीच्या हंगामात जिल्ह्यातील बँकांद्वारा उच्चांकी ९० टक्क्यांवर पीककर्ज वाटप करण्यात आले होते. या कर्जाची मुदतीत परतफेड करणाऱ्या खातेदाराला व नवीन खातेदाराला बँकांद्वारा पीककर्ज वाटप केले जाणार आहे. राज्यस्तरीय बँकर्स समितीद्वारा जिल्ह्याचे कर्जवाटपाचे लक्ष्यांक निश्चित करण्यात आलेले आहे. यानंतर जिल्हास्तरीय समितीची बैठक जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यामध्ये ‘एसएलबीसी’द्वारा लक्ष्यांकाबाबत चर्चा करून व आवश्यक बदल करून यंदाचे पीक कर्जवाटपासाठी १६०० कोटींचे टार्गेट निश्चित करण्यात आलेले आहे.
यानुसार यंदा राष्ट्रीयीकृत बँकांना ९५९ कोटी तर ग्रामीण बँकेला २१ कोटी तर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला ६२० कोटींच्या पीककर्ज वाटपाचे लक्ष्यांक देण्यात आलेले आहे व त्यानुसार बँका आता शेतकऱ्यांना पीककर्जाचे वाटप करणार आहेत.
असे आहे बँकांना कर्जवाटपाचे टार्गेटबँक ऑफ बडोदा ४५ कोटी, बँक ऑफ इंडिया ४५ कोटी, बँक ऑफ महाराष्ट्र १८५ कोटी, कॅनरा २५ कोटी, सेंट्रल बँक ऑफ इंडिया १६५ कोटी, इंडियन बँक २६ कोटी, इंडियन ओव्हरसीज बँक ८ कोटी, पंजाब नॅशनल बँक १५ कोटी, एसबीआय २६५ कोटी, युको बँक ६ कोटी, युनियन बँक ऑफ इंडिया ४५ कोटी, ॲक्सिस बँक ४०, एचडीएफसी ३८, आयसीआयसीआय ३८ कोटी, आयडीबीआय ५ कोटी व इंडसइंड बँकेला ४ कोटींचे उद्दिष्ट आहे.