प्रदीप भाकरे
अमरावती : शासकीय कंत्राटातून मिळविलेले काम पुर्ण करण्यासाठी गुंतवणूक करण्यास भाग पाडून व नफ्याची बतावणी करून येथील एका कंत्राटदाराची १ कोटी ६८ लाख ९४ हजार ८३६ रुपयांनी फसवणूक करण्यात आली. ३ ऑक्टोबर २०२२ ते ३० जून २०२४ पर्यंत ती फसवणुकीची मालिका चालली. याप्रकरणी, चंद्रशेखर पिंपळे (५८, शांतीनिकेतन कॉलनी, अमरावती) यांच्या तक्रारीवरून राजापेठ पोलिसांनी आरोपी शिवम गजानन देशमुख (३३, स्वावलंबीनगर, अमरावती) याच्याविरूध्द ३० जून रोजी रात्री फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.
फिर्यादी चंद्रशेखर पिंपळे हे कंत्राटदार आहेत. दोन वर्षांपुर्वी आरोपीने त्यच्याा प्रतोष प्रिंटींग प्रेस ग्रॉफिक्स या संस्थेस शासकीय कंत्राट मिळाल्याची माहिती पिंपळे यांना दिली. त्याबाबतचा शासकीय मोहोर असलेल्या लेटरपॅडवरील बनावट दस्ताएैवज देखील दाखवला. मात्र, कंत्राट मोठया रकमेचा असल्याने आपण यात गुंतवणूक करावी, अशी विनंती करत त्याने होणाऱ्या नफ्यातून वाटा देण्याचे आमिष पिंपळे यांना दिले. त्यांचा विश्वास संपादन करून त्यांच्याकडून धनादेश व नगदी स्वरुपात ७८ लाख ३० हजार रुपये व त्यांच्या परिचयातील लोकांचे असे एकुण १ कोटी ६८ लाख ९४ हजार ८३६ रुपये घेतले. मात्र आरोपीने आपली फसवणूक केल्याने फिर्यादीचे लक्षात आल्यानंतर त्यांनी आरोपीस पैशांची मागणी केली. त्यावेळी आरोपीने उडवाउडवीचे उत्तरे दिली. त्यामुळे पिंपळे व इतरांनी त्याचा स्वावलंबीनगर येथील फ्लॅट गाठला. मात्र तेथून देखील तो पसार झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे पिंपळे यांनी पोलीस आयुक्त कार्यालयात तक्रार अर्ज दाखल केला. आर्थिक गुन्हे शाखेने प्राथमिक चौकशी करून याबाबत गुन्हा दाखल करण्याचे आदेश राजापेठ पोलिसांना दिलेत. बरहुकूम राजापेठ पोलिसांनी रविवारी रात्री गुन्हा दाखल केला.