प्रदीप भाकरे, अमरावती: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सायबर पोलिस स्टेशन कमालीचे सतर्क झाले असून, आचारसंहिता सुरू झाल्यापासून सोशल मीडियातील आतापर्यंत १७ पोस्ट आक्षेपार्ह असल्याचे निरीक्षण त्यांनी नोंदविले आहे. सोशल मीडिया मॉनिटरिंग सेलच्या माध्यमातून मागील काळात सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या यूजर्सची यादी तयार करण्यात आली आहे. त्यांच्याद्वारे सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या कंटेंटवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहेत. मॉनिटरिंग दरम्यान एकूण १७ आक्षेपार्ह पोस्ट निर्दशनास आल्या आहेत. त्याबाबत संबंधित सोशल मीडियाशी पत्रव्यवहार करण्यात आला आहे. त्यावर कायदेशीर कार्यवाही केली जाणार आहे. त्या १७ पोस्टपैकी सर्वाधिक आक्षेपार्ह पोस्ट या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर करण्यात आल्या आहेत.
अनेक नागरिक व विशेषत: युवावर्ग सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त होत असतो. मात्र, सोशल मीडियावरील काही पोस्ट कायदा व सुव्यवस्थेस बाधक ठरतात. समाजातील प्रत्येक घटकावर त्या पोस्टचा परिमाण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यापूर्वीदेखील सोशल मीडियावर व्यक्त केलेल्या आक्षेपार्ह पोस्टमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेले आहेत. सोशल मीडियावर बहुतांशी वेळेस भ्रामक जाहिराती, अफवा, बदनामीकारक मजकूर प्रसारित केल्यानेसुद्धा समाजामध्ये गैरसमज निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आगामी सण, उत्सव, सभा, मिरवणूक, लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने अमरावती शहर सायबर पोलिसांचे समाजमाध्यमावर घडणाऱ्या हालचालींवर २४ बाय ७ लक्ष आहे.
एक अधिकारी, दोन अंमलदारांचा सेल
पोलिस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, पोलिस उपायुक्त (मुख्यालय) कल्पना बारावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलिस ठाण्याच्या ठाणेदार तथा पोलिस निरीक्षक कल्याणी हुमणे यांच्या नेतृत्वात एक अधिकारी व दोन पोलिस अंमलदारांचे सोशल मीडिया मॉनिटरिंग सेल स्थापन करण्यात आला आहे. त्या सेलच्या माध्यमातून सोशल मीडियावर घडणाऱ्या घडामोडींवर अविरतपणे लक्ष ठेवले जात आहे.
सण, उत्सव, सभा, मिरवणुका तसेच लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सोशल मीडियावर कोणीही आक्षेपार्ह पोस्ट करू नये. तशी पोस्ट निदर्शनास आल्यास त्यावर प्रतिक्रिया किवा प्रतिसाद न देता तात्काळ शहर आयुक्तालयातील सायबर पोलिस ठाण्याच्या ८३२९४७६१३५ या मोबाइल क्रमांकावर माहिती पाठवावी.- कल्पना बारवकर, पोलिस उपायुक्त, अमरावती