जिल्हा सामान्य रुग्णालयात रुग्णांना योग्य उपचार मिळत असल्याने मध्य प्रदेशपासून रुग्ण येथे दाखल होतात. त्यामुळे दर दिवशी हजारावर रुग्णांची बाह्यतपासणी येथे केली जाते. मात्र, फेब्रुवारी महिन्यात कोरोनाचे रुग्ण वाढीस लागल्याने नागरिकांच्या मनात धास्ती निर्माण झाली. त्यामुळे साधा ताप, सर्दी, खोकल्याचा आजार असलेल्या रुग्णांनी भीतीपोटी घरगुतीच उपचार सुरू केल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे ३७९ खाटांच्या या रुग्णालयात प्रत्येक वाॅर्डांत अर्धेच रुग्ण दाखल असल्याचे दिसून येत आहे. १ ते २८ फेब्रुवारी दरम्यान जिल्हा सामान्य रुग्णालयात टायफाईडच्या ३६२ रुग्णांची तपासणी करण्यात त्यापैकी ११३ पाॅझिटिव्ह आले असून त्यांच्यावर तेथे उपचार करण्यात आले. ५१४ रुग्णांची मलेरियाची तपासणी करण्यात आली. मात्र, त्यातील सर्वच निरंक निघाले. ९७४ जणांना श्वान चावल्याने तपासणीकरिता आणण्यात आले. तसेच २६ जणांना सर्पदंशाच्या घटना घडल्यात.४९ रुग्णांची क्षयरोग तपासणी करण्यात आली. त्यापैकी एक पॉझिटिव्ह आल्याची माहिती अधिसेविका चंदा खोडके यांनी दिली.
बॉक्स
कोरोनाची साखळी खंडित
फेब्रुवारी महिन्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत सातत्याने वाढत होत गेली. त्यामुळे मध्यंतरी बिनधास्त वागणऱ्या नागरिकांमध्येदेखील भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे. परिणामी कामाव्यतिरिक्त शहरात फिरणाऱ्यांच्या संख्या घटल्याने कोरोना विषाणूची साखळी खंडित होण्यास मदत होत असल्याचे दोन दिवसांच्या आकडेवारीवरून निदर्शनास येत आहे.