परतवाडा : अचलपूर-परतवाड्यासह लगतच्या परिसरात एकाच दिवशी १८ कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. यात ११ व १५ वर्षीय दोन मुलांचाही समावेश आहे. ५ फेब्रुवारीला जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाकडून प्रसारित यादीतील या कोरोना रुग्णांत अचलपूर, परतवाडा, गुरुनानक नगर, सिव्हील लाईन, सदर बाजार, देवमाळी व फॉरेस्ट डेपो पसिरातील हे रुग्ण आहेत. वृत्त लिहिस्तोवर यातील केवळ दोन रुग्ण अचलपूर कुटी रुग्णालयातील डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलमध्ये दाखल झाले आहेत.
यापूर्वी ४ फेब्रुवारीला ८, तर ३ फेब्रुवारीला ९ रुग्ण कोरोना संक्रमित निघालेत. ६ कोरोना संक्रमितांसह एकाच्या मृत्युमुळे प्रकाशझोतात आलेल्या अभिनव कॉलनीतही नव्याने तीन रुग्ण कोरोना बाधित निघाले आहेत. अलीकडच्या काही दिवसांतील कोरोना बाधितांची वाढती संख्या बघता अचलपूर नगरपालिका क्षेत्रासह लगतचा परिसर कोरोनाच्या अनुषंगाने हॉटस्पॉट बनत चालला आहे. दरम्यान जंतुनाशक फवारणीसह निर्जंतुकीकरणाकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात आहे. मास्क न लावणाऱ्यांसह सोशल डिस्टन्सिंग न पाळणाऱ्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. कोरोनाच्या त्रिसूत्रीचा शहरात पार फज्जा उडाला आहे.