धामणगाव रेल्वे : आगामी काळात होणाऱ्या तालुक्यातील ५५ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी तयार केलेल्या मतदार यादीवर १८ गावांतून आक्षेप नोंदविण्यात आले आहेत. यादरम्यान ८०० मतदारांनी छायाचित्र निवडणूक प्रशासनाकडे जमा न केल्यामुळे त्यांची नावे यादीतून काढण्यात येणार आहेत.
तालुक्यातील ५३ ग्रामपंचायतींची निवडणूक कोरोनामुळे स्थगित झाली. आता नायगाव, उसळगव्हाण या दोन ग्रामपंचायतींची मुदत संपल्याने त्यात भर पडली. १ ते ७ डिसेंबरपर्यंत मतदार यादीवर आक्षेप नोंदविणे गरजेचे होते. शेवटच्या दिवशी कासारखेड, घुसळी, अशोकनगर, जळगाव, दिघी महल्ले, जळगाव आर्वी, चिंचपूर, सोनेगाव खर्डा, आजनगाव, शिंदोडी, वकनाथ या ग्रामपंचायतींमधील नेत्यांनी मतदार यादीवर आक्षेप नोंदविला. आगामी दोन दिवसांत मतदार यादी अद्ययावत करण्यात येणार आहे.
दरम्यान, तालुक्यातील ५५ ग्रामपंचायतींमधील १७४ वाॅर्डांतील ८०० जणांनी छायाचित्र निवडणूक प्रशासनाकडे दिले नसल्यामुळे ही नावे मतदार यादीतून काढण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार जगदीश मंडपे यांनी दिली. तीन दिवसांत ही मतदार यादी दुरुस्त करून १० डिसेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचे नरेश इंगळे यांनी सांगितले.
-----------