लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : गुरुकुंज उपसा सिंचन योजनेमुळे १८ हजार एकर जमीन सिंचनाखाली येणार असून, कृषी उत्पादकता वाढेल व शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावतील, असे प्रतिपादन पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी शनिवारी मोझरी येथे केले.गुरुकुंज उपसा सिंचन योजनेच्या कामाची पाहणी पालकमंत्र्यांनी केली. त्यानिमित्त मोझरी येथील दासटेकडी येथे आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. जलसंपदा विभागाच्या अधीक्षक अभियंता रश्मी देशमुख, तहसीलदार वैभव फरतारे, माजी जलसंपदा अधीक्षक अभियंता रमेश ढवळे आदी मान्यवर उपस्थित होते.जिल्ह्यात सिंचनाचे क्षेत्र वाढावे यासाठी पूर्वीपासून निरंतर प्रयत्न सुरू आहे. माजी आमदार स्व. भैय्यासाहेब ठाकूर यांनी १९८४ मध्ये शेतकरी बांधवांना सिंचनासाठी पाणी मिळावे म्हणून या उपसा सिंचन प्रकल्पाची मागणी केली. परिसरातील शेतीत पाणी पोहोचून शेतकरी बांधवांना बारमाही सिंचनाची सुविधा निर्माण व्हावी, असे त्यांचे स्वप्न होते. त्याची पूर्ती या योजनेच्या साकारण्यातून होत आहे. योजना पूर्णत्वासासाठी सातत्याने पाठपुरावा करत तांत्रिक अडचणींवर मात करण्यात आली. उर्ध्व वर्धा सिंचन प्रकल्प योजनेंतर्गत गुरुकुंज उपसा सिंचन योजना साकारण्यात येत आहे. यामुळे गुरुदेवनगर, मोझरी, शेंदोळा (खु.), विचोरा, मालेगाव, फत्तेपूर, शिवणगाव, कोळवण, शेंदूरजना (बु.), शेंदूरजना (खु.), अनकवाडी, रघुनाथपूर, रंभापूर, पाळवाडी, कवाडगव्हाण, अदमपूर, धोटे, वऱ्हा, भांबोरा, वाठोडा, मालधूर, शिरजगाव आदी २२ गावांना सात हजार १०९ हेक्टर शेतीला सिंचनाचा लाभ होणार आहे. विंचोरी येथे उपकालव्याद्वारे शेतापर्यंत पाणी पोहोचले आहे. इतर कामही पूर्ण होईल. पूरक व्यवसायांनाही चालना देणार, असे ना.यशोमती ठाकूर म्हणाल्या. शेतीसोबत पूरक व्यवसायही वाढीस लागावेत, असा त्यांचा प्रयत्न आहे. जेणेकरून सिंचनाने कृषी उत्पादकता वाढण्याबरोबरच उत्पन्नाचे पर्यायी मार्गही उभे राहतील. या प्रकल्पासाठी उर्ध्व वर्धा प्रकल्पाच्या उजव्या मुख्य कालव्यातून पाणी उचल होणार आहे.