अमरावती : विधान परिषदेच्या पदवीधर मतदारसंघाचा कार्यक्रम गुरुवारी जाहीर झाल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी शुक्रवारी अंतिम मतदार यादी जाहीर केली. यामध्ये १,८६ ३६० मतदारांचा समावेश आहे. प्रारूप मतदार यादीच्या तुलनेत ६०,४३६ ने वाढ, तर सन २०१७च्या तुलनेत सद्यस्थितीत २४,१५१ ने मतदार संख्या कमी झाल्याचे दिसून येते.
अमरावती विभाग पदवीधर मतदार संघातील आमदारांचा कालावधी ७ फेब्रुवारी २०२३ रोजी समाप्त होत आहे. त्या अनुषंगाने भारत निवडणूक आयोगाद्वारा सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे विभागातील पाचही जिल्ह्यांत आचारसंहिता लागू झालेली आहे. ती २ फेब्रुवारी रोजी मतमोजणी संपेपर्यंत सुरू राहणार आहे.
पदवीधर मतदारसंघात दर सहा वर्षांत किमान १० टक्के मतदार संख्या वाढ गृहित धरण्यात येते. यामध्ये काही मतदार मृतदेखील होतात. त्यानुसार यावेळेस किमान २.३५ ते २.४० लाखांचे दरम्यान मतदार संख्या राहील, अशी निवडणूक विभागाची अपेक्षा होती. प्रत्यक्षात ती संख्यादेखील पार झालेली नसल्याने यावेळी पदवीधरांमध्ये असलेला अनुत्साह चर्चिला जात आहे. या मतदार संघासाठी प्रत्येकवेळी नव्याने मतदार यादी तयार केली जाते. त्यानुसार निवडणूक विभागाने प्रत्येक जिल्ह्यात जनजागृती केली होती.
जिल्हानिहाय तुलनात्मक मतदार संख्या
जिल्हा : २०१७ - २०२२
- अमरावती : ७६,६७१ - ५७,०६४
- अकोला : ४७,१८६ - ४४,५०६
- यवतमाळ : ३२,९९९ - ३३,२४९
- बुलढाणा : ३४,९१९ - ३६,४९७
- वाशिम : १८,५३६ - १५,०४४
एकूण : २,१०,५११ - १,८६,३६०