चांदूर रेल्वे : तालुक्यातील २९ ग्रामपंचायतीच्या निवडणूक प्रक्रियेला २३ डिसेंबरपासून सुरुवात झाली. ग्रामपंचायत निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्र ऑनलाईन भरून दाखल करण्याचा बुधवारी पहिला दिवस होता. चांदूर रेल्वे तालुक्यात दुसऱ्या दिवशी १९ नामनिर्देशनपत्र दाखल करण्यात आले. आता शुक्रवार, शनिवार व रविवार अशी सलग तीन दिवस सुटी आल्याने इच्छुकांना आता सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत.
निर्वाचन अधिकारी तथा तहसीलदार राजेंद्र इंगळे, निवडणूक निर्णय अधिकारी सावन जाधव, राजेंद्र घड्डीनकर, गणेश घोगरकर, मीना म्हसतकर, सुरेश चव्हाण, ए. आर. चवरे, सतीश गोसावी, एस. एस. लंगडे, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी राहुल कुकडी, चंद्रशेखर जयसिंगपुरे, भारत कांबळे, पंकज खानझोडे, दीपक शिरसाट, जितेंद्र मेश्राम, शिवदास चव्हाण, सी. एल. मोरे हे काम पाहत आहेत. कोरोनाचा वाढता प्रभाव व कोरोनाचा नवीन प्रकार विदेशात आढळून आल्याच्या पार्श्वभूमीवर राजेंद्र इंगळे यांच्या सूचनेनुसार निवडणूक प्रक्रियेत सहभागी असणारे निवडणूक निर्णय अधिकारी व सहायक निवडणूक अधिकारी तसेच कर्मचारी असे एकूण ३६ कर्मचाऱ्यांची बुधवारी कोविड चाचणी घेण्यात आली. तालुक्यातील २९ ग्रापंच्या निवडणुकीतील उमेदवार जेव्हा नामनिर्देशनपत्र दाखल करण्याकरिता आपल्या एका समर्थकासह कार्यालयात येतील तेव्हा त्या दोघांनी तहसील कार्यालयातच कोविड चाचणी करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन इंगळे यांनी केले आहे.