फोटो पी ३१ भामकर
परतवाडा : शहरालगतच्या देवमाळी येथील भामकर हॉस्पिटलच्या खासगी कोविड सेंटरमध्ये तीन महिन्यांत १९ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. त्या तुलनेत कुटीर रुग्णालयात दहा महिन्यांत १३ रुग्णांच्या मृत्यूची शासकीय नोंद आहे.
कच्चे बिल, अव्वाच्या सव्वा दर या व अन्य नानाविध कारणांनी वादग्रस्त ठरलेल्या येथील भामकर हॉस्पिटलमधील अनेक किस्से आता पुढे येऊ लागले आहेत. कोरोनाची प्रचंड दहशत आणि तालुक्यातील पहिलेच खाजगी कोविड रुग्णालय असल्याने आजूबाजूच्या तालुक्यासह परिसरातील रुग्णांनी विश्वास दाखवत तेथे उपचार घेतला. पीपीई किट न देताच अव्वाच्या सव्वा देयके, एकाच खोलीत तीन ते चार रुग्ण ठेवून स्वतंत्र खोलीची रक्कम त्यांच्याकडून घेण्यात आली. कोरोनाच्या नावावर सुरू असलेली आर्थिक लूट नातेवाइकांना मनस्ताप देणारी ठरली आहे. तक्रारीनंतर जिल्हा प्रशासन जागृत झाले असून, आतापर्यंत दाखल रुग्णांबाबतसुद्धा चौकशी समिती गठित करून माहिती घेण्याची मागणी होत आहे.
बॉक्स
तीन महिन्यांत १९ मृत्यू
देवमाळी स्थित भामकर डेडिकेडेट कोविड हॉस्पिटल अचलपूर तालुक्यातील येसुर्णा प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येते. कोरोना रुग्णांसंदर्भात पर्यवेक्षक अरविंद पिहुलकर यांनी वारंवार माहिती मागूनसुद्धा दिली गेली नाही. अखेर शनिवारी सायंकाळी माहिती दिली. त्यानुसार ३ मार्चपासून सुरू झालेल्या या रुग्णालयात २९ मे पर्यंत ६५० रुग्ण दाखल झाले. त्यापैकी ६१४ रुग्ण बरे झाले, तर १९ रुग्णांचा मृत्यू झाला. १७ जण भरती असल्याची माहिती भामकर हॉस्पिटलच्यावतीने डॉ. हेमंत चिमोटे यांनी आरोग्य यंत्रणेला दिली.
बॉक्स
कुटीरमध्ये दहा महिन्यांत १३ मृत्यू
अचलपूर येथील कुटीर रुग्णालयात कोरोना संक्रमित रुग्णांसाठी गत वर्षी जुलै महिन्यापासून ६४ बेडचे रुग्णालय सुरू करण्यात आले. दहा महिन्यांत १५५१ रुग्ण दाखल झाले. त्यापैकी ११९७ रुग्ण उपचारानंतर बरे झाले. २७७ रुग्णांना उच्चस्तरीय उपचारासाठी अमरावती येथे संदर्भित करण्यात आले, तर १३ रुग्णांचा येथे मृत्यू झाला असल्याची माहिती रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी मोहम्मद झाकीर यांनी ‘लोकमत’ला दिली.
बॉक्स
अनेकांना कच्चे बिल?
दाखल रुग्णांना कच्चे बिल दिले जात असल्याची तक्रार रुग्ण रामदास आवारे यांचे नातेवाईक रूपा आवारे यांनी केल्यावर भामकर हॉस्पिटलतर्फे त्याचे स्पष्टीकरण देण्यात आले होते. रुग्ण वा त्याच्या नातेवाइकाने मागणी केल्यास पक्के बिल देण्यात येत असल्याचे डॉ. भामकर म्हणाले होते. मात्र, तोच प्रकार इतरही रुग्णांसोबत झाल्याचे पुढे आले आहे. त्यामुळे रुग्णालयाचा तो दावा तद्दन खोटा ठरत आहे. विहिगाव येथील आशिष बाभूळकर यांना दिलेले कच्चे बिल ‘लोकमत’च्या हाती लागले आहे.
कोट
येसुर्णा आरोग्य केंद्राअंतर्गत भामकर रुग्णालयाचा समावेश आहे. वारंवार माहिती मागून देण्यात आली नाही. परंतु, शनिवारी दिलेल्या माहितीनुसार तेथे तीन महिन्यांत १९ कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले.
डॉ. प्रवीण कोरडे, आरोग्य अधिकारी, येसुर्णा आरोग्य केंद्र, ता. अचलपूर