धामणगाव कडकडीत बंद : शंकर महाराजांच्या अटकेची जोरदार मागणीअमरावती : पिंपळखुटा येथील शंकर महाराजांच्या आश्रम परिसरात दोघांचे नरबळी देण्याचे प्रयत्न झाले. हे अविश्वसनीय प्रकार उघडकीस आल्यानंतर जिल्हाभरातून शंकर महाराजांच्या अटकेची मागणी जोर धरत आहे. याच मागणीसाठी शुक्रवारी धामणगाव तालुक्यातील १९ संस्था, संघटनांनी एकत्रितपणे रस्त्यावर उतरून शासनाचे लक्ष वेधले.व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने प्रतिष्ठाने बंद ठेवून आश्रमातील या लज्जास्पद आणि क्रूर प्रकाराचा निषेध केला. ज्या आश्रम परिसरात हे गुन्हे घडले त्या आश्रमाचे प्रमुख शंकर महाराज यांना देण्यात आलेले अभय जनभावनेचा अनादर होय. त्यांना अटक करून प्रकरणाचा तपास सीआयडीकडे सोपवा, अशी आग्रही मागणी आंदोलकांनी केली. कडकडीत बंद ठेवून धामणगाववासीयांनी प्रथमेश आणि अजय यांच्या वेदनांमध्ये सहभाग दर्शविला. दुपारी १२ वाजता शास्त्री चौकातून तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला़ नगरपरिषद परिसरातील डॉ़बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हारार्पण करून शाहीर धम्मा खडसे यांच्याद्वारे मोर्चाला सुरूवात झाली. मोर्चात विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसह शेकडो नागरिक सहभागी झाले होते. मोर्चातून व्यक्त झाली खदखद अमरावती : ‘शंकर महाराजांच्या आश्रमाची सीआयडी चौकशी करा, शंकर महाराजांना अटक करा, व्यवस्थापन मंडळावर नरबळीचे गुन्हे दाखल करा, अशा गगणभेदी घोषणा देत हा मोर्चा टिळक चौक, सिनेमा चौक, गांधी चौक, अमरशहीद भगतसिंग चौक, कॉटन मार्केट चौकमार्गे तहसील कार्यालयाजवळ धडकला. पोलिसांनी तहसील कार्यालय परिसरात मोर्चा अडविल्याने तेथेच सभेत रूपांतर झाले़ शिवसेनेचे तालुका प्रमुख बाबा ठाकूर, लहुशक्ती सेनेचे उमेश भुजाडणे, मुकुंद रंगारी, माजी आमदार पांडुरंग ढोले, सत्यनारायण सूर्योदय, मनसेचे तालुकाप्रमुख रणजित पाटेकर, संजय वानखडे, लहुजी शक्तीसेनेचे विदर्भाध्यक्ष रूपेश खडसे, पंकज जाधव, मातंग समाजाचे नेते गणेशदास गायकवाड, वाहतूक सेनेचे जिल्हाप्रमुख मुन्ना मिश्रा, युवा सेनेचे जिल्हा प्रमुख प्रकाश मारोडकर, माथाडी कामगार सेनेचे तालुकाध्यक्ष सरफराज खान, विजय गायकवाड, उत्तमराव भैसने, योगेश अंबोरे, संतोष वाघमारे, विनोद तिरिले यांची आक्रमक भाषणे झालीत़मोर्चात नरबळी विरोधी कृती समिती, लहुजी शक्तीसेना, शिवसेना, मनसे, डॉ़बाबासाहेब आंबेडकर कर्मचारी संघटना, कम्युनिस्ट पार्टी आॅफ इंडिया, आरपीआय कवाडेगट, महाराष्ट्र नाभिक संघटना, भ्रष्टाचार निर्मूलन समिती, राष्ट्रीय चर्मकार संघटना, जनता दल, आम्ही भारतीय संघटना, भारिप बहुजन महासंघ, महाराष्ट्र विकास माथाडी संघटना, पाटील संघटना, मानवाधिकार संघटना, जिवक बहुउद्देशीय संघटना, अ.भा.विद्यार्थी सेनेच्या कार्यकर्त्यांसह धामणगाव रेल्वे, बाभुळगाव, पुलगाव, तिवसा, वर्धा, यवतमाळ येथील मातंग समाजाचे नेते सहभागी झाले होते़ सभेचे संचालन धम्मा खडसे तर आभार प्रदर्शन नीलेश वानखडे यांनी केले़ आश्रमातील दोघांना अटक केली़ चांदूररेल्वेचे पोलीस उपविभागीय अधिकारी श्रीनिवास घाडगे यांच्या मार्गदर्शनात दत्तापूरचे ठाणेदार अशोक लांडे, मंगरूळ दस्तगीरचे ठाणेदार शैलेश शेळके, तळेगाव दशासर, कुऱ्हा येथील पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. सुरेंद्र, नीलेशला आणखी नऊ दिवस पोलीस कनरबळी प्रकरणातील आरोपी सुरेंद्र मराठे आणि नीलेश उके यांना शुक्रवारी पुन्हा नऊ दिवसांचा पीसीआर मंजूर करण्यात आला. जिल्हा सत्र न्यायाधीश एस.एस. भिष्म यांनी हा पीसीआर मंजूर केला. धर्मदाय सहआयुक्त घेणार का दखल ?पिंपळखुटा येथील शंकर महाराजांच्या आश्रमाच्या अखत्यारित असलेल्या वसतिगृहात नरबळी देण्याचा दोनदा प्रयत्न झाला. हा प्रकार आश्रम परिसरातच घडला. या घटनेनंतर लोकभावना उफाळून आल्या आहेत. आश्रम ट्रस्ट ज्यांच्या अधिकार क्षेत्रात येते ते धर्मदाय सहआयुक्त कार्यालय यासंबंधाने भूमिका घेणार की कसे, याबाबत सामान्य जणांना उत्सुकता आहे. देणगीदात्यांच्या चौकशीची मागणी पिंपळखुटा येथील शंकर महाराजांच्या आश्रमाला मुंबई, पुणे, नागपूर या मोठ्या शहरातील अनेक लब्धप्रतिष्ठितांद्वारे भरघोस देणग्या दिल्या जातात. या देणग्या देण्यामागे त्यांचा उद्देश काय? हादेखील चिंतेचा विषय आहे. काळा पैसा पांढरा करणाऱ्या या देणगीदात्यांच्या संपत्तीची चौकशी करावी. आश्रमाचे संचालक शंकर महाराज व व्यवस्थापन मंडळदेखील या नरबळी प्रकरणाचे प्रमुख सूत्रधार असल्याने त्यांना तातडीने अटक करावी, अशा मागण्यांचे निवेदन तहसीलदार चंद्रभान कोहरे यांच्यामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गृहराज्यमंत्री रणजित पाटील, गृहराज्यमंत्री (ग्रामीण) दीपक केसरकर यांना पाठविण्यात आले.
१९ संघटना उतरल्या रस्त्यावर
By admin | Published: August 19, 2016 11:55 PM