लक्षवेधी चिन्हांवर उमेदवारांचा डोळा : संख्या वाढल्याने उमेदवारांना पर्याय वाढले
अमरावती : सीसीटीव्ही, मोबाईल चार्जर, कम्प्यूटर, पेन ड्राईव्ह यांच्यासह इतर साधने आता प्रत्येकाच्या जीवनाची अत्यावश्यक साधने बनली आहेत. शिक्षण कमी असलेल्या व्यक्तीही या साधनांचा प्रभावी वापर करताना दिसत आहेत. त्यामुळेच निवडणूक आयोगाने आता होत असलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत यांसह इतर अत्याधुनिक साधनांचा चिन्हांमध्ये समावेश केला आहे. लक्षवेधी चिन्हे आपल्याला मिळावी, यासाठी उमेदवार प्रयत्नशील आहेत.
जिल्ह्यातील ५५३ ग्रामपंचायतीसाठी निवडणूक होत आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आता ४ जानेवारीला अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. त्यानंतर चिन्हवाटप होऊन प्रचाराचा धुरळा उडणार आहे. या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने यंदा चिन्हांत वाढ केली आहे. पारंपरिक पद्धतीने चालत आलेल्या चिन्हांतून प्राण्यांना वगळण्यात आले असून, इतर प्रत्येकाच्या वापरातील वस्तूचे आता चिन्हस्वरूपात पर्याय दिले आहेत. १९० निवडणूक चिन्हांमध्ये आधुनिकता दिसून येत आहे. आबालवृद्धांच्या हाती आलेल्या मोबाईलसह इतर इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा यात समावेश करण्यात आल्याने उमेदवारांना चिन्हांबाबत अनेक पर्याय उपलब्ध झाले आहेत.
बॉक्स
वेगवेगळ्या चिन्हांवर लढावे लागणार
ग्रामपंचायत निवडणुकीत प्रभाग पद्धत असल्याने एका प्रभागात किमान तीन उमेदवार राहतील. या उमेदवारांचे पॅनेल जरी एक असले तरी प्रत्येक उमेदवाराला निवडणूक चिन्ह वेगवेगळे मिळणार आहे. त्यामुळे उमेदवारांची कसरत होणार आहे.
बॉक्स
पेन ड्राईव्ह, इस्त्री, फलंदाज या चिन्हांची पडली नव्याने भर
निवडणूक आयोगाने या निवडणुकीसाठी चिन्हांची यादी प्रसिद्ध करताना त्यात अनेक पर्याय उमेदवारांना दिले आहेत. त्याचा आधुनिकतेची जोड देण्यात आली आहे.
इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स आता प्रत्येकाच्या जीवनाचा भाग बनले आहे. त्यामुळेच वाढविलेल्या निवडणूक चिन्हांमध्ये या वस्तू ठेवण्यात आले आहेत.
निवडणूक आयोगाने चिन्हे देताना काही गंमतीदार चिन्हेही त्यात दिली आहेत. विहीर, सीसीटीव्ही, चार्जर व इतर साधनांची निवडणूक चिन्हे मान्य झाली आहेत. उमेदवाराने हे चित्र मागितल्यास त्या चिन्हांची अधिक चर्चा होत आहे.
बॉक्स
अशी आहे चिन्हे.....
निवडणूक आयोगाने निवडणुकीसाठी १९० चिन्हांची यादी जाहीर केली आहे. त्यात कपाट, सफरचंद, ऑटोरिक्षा, फुगा, बॅट, पुस्तक, बादली, केक, कॅमेरा, कॅरम बोर्ड, कोट, कंगवा, हिरा, कपबशी, फुटबॉल, चष्मा, हाॅकी, इस्त्री, जग, किटली, चावी, लॅपटॉप, लुडो, कढई , पेन ड्राईव्ह, छत्री, अननस, कैची, पांगुळगाडा, टोपली, फलंदाज, विजेचा खांब, डिश अँटेना, ऊस, बासरी, मिक्सर, पंचिंग मशीन, फ्रिज, शिवणयंत्र, स्कूटर, सोपा, बिगुल, तुतारी, टाइपरायटर, अक्रोड , कलिंगड, पाण्याची टाकी, विहीर, शिट्टी, चिमटा, नांगर
कोट
निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार या निवडणुकीत अनेक चिन्हांचा समावेश करण्यात आला आहे. उमेदवारांना चिन्हांची निवड सुलभपणे व्हावी, यासाठी प्रत्येक निवडणूक कार्यालयाबाहेर दर्शनी भागात चिन्हांची माहिती प्रसिद्ध करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
- नितीन व्यवहारे, उपजिल्हाधिकारी निवडणूक