अमरावती : आदिवासी समाजाचे कलाजीवन, सांस्कृतिक जतन व संवर्धन करण्यासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे 'गोंडवाना सांस्कृतिक संग्रहालय' केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्या माध्यमातून नागपूर येथे उभारण्यात येणार आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या या संग्रहालयासाठी १९१ कोटींचा प्रस्ताव २२ नोव्हेंबर २०२२ रोजी शासनाला सादर केला असून अंतिम मंजुरीच्या प्रतीक्षेत असल्याची माहिती २३ मार्च रोजी आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी विधानसभेत दिली आहे.
अर्थसंकल्पीय अधिवेशनात आमदार भीमराव केराम यांनी गोंडवाना संग्रहालयाचा प्रश्न विधानसभेत लक्षवेधीद्वारे उपस्थित केला होता, हे विशेष. आदिवासी संस्कृतीचा प्रचार-प्रसार व संवर्धन झाले पाहिजे म्हणून गोंडवाना सांस्कृतिक संग्रहालयाची घोषणा २०१३ मध्ये झाली होती. याकरिता केंद्र सरकारने सन २०१४ मध्ये १० कोटी व २०१५ मध्ये ११ कोटी असे एकूण २१ कोटी रुपये मंजूर केले आहे. जागेअभावी संग्रहालयाचे काम रखडलेले होते. मात्र सुराबर्डी येथे आधी १० एकर व नंतर ५ एकर जागा अशी १५ एकर जागा उपलब्ध झालेली आहे. आता मात्र राज्य सरकारचा निधी मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे.
पुणे येथील आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेस ५० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल तत्कालीन राष्ट्रपतींनी या संस्थेला स्वायत्त संस्था म्हणून मान्यता देत एक उपकेंद्र नागपूर येथे स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या उपकेंद्राला गोंडवाना सांस्कृतिक संग्रहालय असे नाव देण्यात आले आहे. या संग्रहालयाकडे आता आदिवासी समाजाचे लक्ष लागले आहे.आदिवासी संघटना, आमदारांचेही पत्र
विदर्भात गोंडीयन समाज मोठ्या प्रमाणात आहे. इतिहासामध्ये गोंडीयन संस्कृती व गोंड राजांना अनन्यसाधारण महत्व आहे. विशेष म्हणजे नागपूर नगरी गोंडराजे बख्तबुलंदरशहा यांनी ३५० वर्षापूर्वी बसवली आहे. आदिवासी समाजाचे जीवन, कला, भाषा, संस्कृतीचे जतन व संवर्धन करण्यासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे संग्रहालय उभारण्यासाठी सरकारकडे ट्रायबल फोरम संघटना व केळापूर-आर्णी मतदार संघाचे आमदार डॉ. संदीप धुर्वे यांनी पत्रव्यवहार केलेला आहे.
आदिवासी संघटना, आमदारांचेही पत्र
विदर्भात गोंडीयन समाज मोठ्या प्रमाणात आहे. इतिहासामध्ये गोंडीयन संस्कृती व गोंड राजांना अनन्यसाधारण महत्व आहे. विशेष म्हणजे नागपूर नगरी गोंडराजे बख्तबुलंदरशहा यांनी ३५० वर्षापूर्वी बसवली आहे. आदिवासी समाजाचे जीवन, कला, भाषा, संस्कृतीचे जतन व संवर्धन करण्यासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे संग्रहालय उभारण्यासाठी सरकारकडे ट्रायबल फोरम संघटना व केळापूर-आर्णी मतदार संघाचे आमदार डॉ. संदीप धुर्वे यांनी पत्रव्यवहार केलेला आहे