चांदूर बाजार : स्थानिक ग्रामीण रुग्णालयात ६० वर्षे व त्यावरील वयोगटातील ज्येष्ठ नागरिकांकरिता लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. यात अवघ्या ६ दिवसांत १९३ ज्यष्ठ नागरिकांनी लस घेतली आहे. लसीकरणाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, ग्रामीण भागातील ज्येष्ठ नागरिक कोरोना लसीकरणाच्या प्रतीक्षेत आहे.
देशात कोविड योद्धांसाठी लसीकरण मोहिमेचा पहिला टप्पा राबविल्यानंतर आता कोरोनाच्या दुसऱ्या टप्प्यात ६० वर्षे व त्यावरील वयोगटातील ज्येष्ठ नागरिकांकरिता लसीकरण सुरू आहे. चांदूर बाजार येथील ग्रामीण रुग्णालयात लसीकरण केंद्रावर १ मार्चपासून लसीकरणाला सुरुवात झाली. लसीकरण केंद्रावर ६ दिवसांत १९३ ज्येष्ठ नागरिकांनी नोंदणी करून लस घेतल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी ज्योत्स्ना भगत यांनी दिली. या मोहिमेमुळे कोरोनाला रोखण्यात तसेच मृत्यूदर कमी करण्यास मदत होईल, असा विश्वास ज्येष्ठ नागरिकांतर्फे व्यक्त केला जात आहे. भारतात निर्मित करण्यात आलेल्या आणि संपूर्ण स्वदेशी असलेली कोवीशिल्ड ही लस सध्या मोठ्या प्रमाणात ज्येष्ठ नागरिकांना देण्यात येत आहे.
ऑनलाईन नोंदणी करताना सातत्याने सर्वर डाऊन होत असल्यामुळे लसीकरणासाठी नागरिकांची होणारी गर्दी व ज्येष्ठांची गैरसोय टाळण्याकरिता नागरिकांनी ऑफलाईन नोंदणी करण्याचे आवाहन तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी केले आहे. लसीकरणाच्या या मोहिमेत डॉ. विशाखा खडसे, प्रयोगशाळातज्ज्ञ भोंबे, नितीन गणवीर, सोळंके हे महत्त्वाची जबाबदारी पार पाडत आहेत.