वरूड : कोरोना संसर्गाला प्रतिबंध घालण्याकरिता केंद्र सरकारने ४५ वर्षांवरील नागरिकांना कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिनचे लसीकरण मार्चपासून सुरू केले. यात वरूड शहरातील ग्रामीण रुग्णालयाचे केंद्रासह तालुक्यातील ११ केंद्रांवर लसीकरण करण्यात आले. यामध्ये १४ एप्रिलपर्यंत एकूण १९,६८७ व्यक्तींना पहिल्या टप्प्यातील, तर दुसऱ्या टप्प्यातील १,४१२ नागरिकांना लस देण्यात आली.
वरूड शहरातील ग्रामीण रुग्णालय आणि शेंदूरजनाघाट, पुसला, लोणी, राजुराबाजार, आमनेर, बेनोडा या प्राथमिक आरोग्य केंद्रात, तर मांगरूळी, जरूड, हातुर्णा, वाठोडा उपकेंद्रात लसीकरण मोहीम सुरू आहे. यामध्ये एक मार्चपासून १४ एप्रिलपर्यंत १९,६८७ नागरिकांनी पहिल्या टप्प्यातील लस घेतल्याची नोंद आहे. लसीकरणाला चांगला प्रतिसाद मिळत असून दिवसागणिक शेकडो नागरिक याचा लाभ घेत आहेत. ३०० पेक्षा अधिक कोरोना चाचण्या तालुका वैद्यकीय कार्यालय आणि ग्रामीण रुग्णालयात घेतल्या जात असून ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रमोद पोतदार आणि तालुका वैद्यकीय अधिकारी अमोल देशमुख यांत्या नियंत्रणात लसीकरण मोहीम सुरू आहे.